जितेंद्र कोठारी, वणी:शुक्रवारी सकाळी वणीतील नांदेपेरा रोडवरील वांजरी शेतशिवारात एका विवाहितेची दगडाने प्रहार करून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. मृत तरुणीची ओळख पटल्यानंतर वणी पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवून अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केले. अनैतिक संबंधातून विवाहितेच्या प्रियकरानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय सालवटकर (45) रा. साखरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर याला बेड्या ठोकल्या आहे.
मृतक जया मनोज आवारी (32) ही वणी तालुक्यातील पिंपळगाव येथील रहिवाशी होती. 10-12 वर्षांपूर्वी तिचा विवाह वडोदा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील मनोज आवारी सोबत झाला. लग्नानंतर ती वडोदा येथे पतीसोबत राहायची. त्यांना दोन मुलं ही आहेत. दरम्यान तिची ओळख गावातीलच सुमो वाहन चालक संजय सालवटकर सोबत झाली. संजय तिच्या मुलांना शेगाव येथे शाळेत ने-आण करायचा. दरम्यान त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.
बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...
काही दिवसातच मृतक जया आणि संजयच्या अनैतिक संबंधाची कुणकुण जयाच्या पतीला लागली. त्यावरून पती पत्नीचे घरात नेहमी भांडण व्हायचे. सततच्या भांडणाला कंटाळून जयाने चार पाच वर्षांआधी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ती आपल्या दोन मुलांसह वणी येथील एसटी डेपोच्या मागे असलेल्या पटवारी कॉलनीत भाड्याने राहत होती. मात्र या दरम्यान संजय आणि जयाचे अनैतिक संबंध सुरूच होते. रात्री 8 वाजता दरम्यान जया आपल्या मुलांना मामाच्या घरी जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र सकाळी दगडाने ठेचलेल्या अवस्थेत तिचा मृतदेच आढळून आला होता.
मृत महिलेचे वडील भगवान मोतीराम मत्ते रा. पिंपळगाव तालुका वणी यांनी तक्रार केली. पोलिसांनी संशयित म्हणून वागदरा येथील एका तरुणास ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान वागदरा येथील तरुणाचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी मृत युवतीचे कॉल डिटेल्स आणि संपर्कातील व्यक्तींकडून विचारपूस केली असता त्यांना तिच्या प्रियकराबाबत माहिती मिळाली. पोलिसांनी जयाचा प्रियकर संजय शामराव सालवटकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली. आधी तर संजयने ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेतली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच संजय पोपटासारखा बोलू लागला. त्याने गुन्हा कबूल करत हत्येबाबत संपूर्ण माहिती पोलिसांना दिली.
गुरुवार 10 डिसें रोजी आरोपी संजय हा जयाला भेटण्यासाठी वणी येथे आला. दरम्यान जया घरी मामाच्या घरी जाते अशी सांगून ती तिचा प्रियकर संजयला भेटायला वरोरा रोडवरील जगन्नाथ मंदिराजवळ गेली. तिथून संजयच्या सुमोने ते दोघेही वणी नांदेपेरा मार्गावर निघाले. दोघे रसोया सोया प्लांटच्या पुढे वांजरी शेत शिवारात एका शेतातील गोठ्यामागे गेले. तिथे त्या दोघांमध्ये वाद झाला. आरोपीने जयाच्या डोक्यावर उजव्या बाजूला लोखंडी रॉडने वार केला. त्यानंतर आरोपीने एका मोठ्या दगडाने तिच्या चेहऱ्यावर वार करून जागीच ठार केले.
खून केल्यानंतर आरोपीने मृतकाचा मोबाईल आपल्या गावातील शेतात लपवून ठेवला. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली टाटा सुमो (एम.एच.34 ए. व्ही. 9524) लोखंडी रॉड व मोबाईल हँडसेट जप्त केले. आरोपीला वणी न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळविली आहे.
निर्घृण हत्या करण्यामागे आहे हे कारण? दोन दिवसांपू्र्वी वणी पोलीस ठाण्यात एका महिलेचा बलात्कार झाल्याची तक्रार करण्याबाबत कॉलही आला होता. पोलिसांना ती महिला जयाच असावी असा दाट संशय होता. पोलिसांनी प्रकरणाचा अनैतिक संबंधाच्या दिशेने सुरू केला. या प्रकरणी आधी पोलिसांनी वागदरा येथील एका तरुणाला ताब्यात घेतले होते. मात्र तपासात त्यांना संजयबाबत माहिती मिळाली.
मृतक जया आणि संजयमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. गेल्या अनेक वर्षांपासून संजय जयाला आर्थिक मदत करीत होता. मात्र काही काळापासून जया सारखी पैशासाठी त्रास द्यायची. शिवाय पैसे न दिल्यास धमकीही द्यायची. आठ दहा दिवसांपूर्वीच संजयने जयाला 10 हजार रुपये दिले होते. मात्र त्यानंतर लगेच एक आठवड्यात जयाने पुन्हा 40 हजारांची मागणी केली. सततची पैशाची मागणी आणि धमकी याला संजय कंटाळला होता. संजय याने 40 हजार रुपये देतो असे सांगून जयाला वरोरा रोड वरील जगन्नाथ महाराज देवस्थान जवळ बोलेवले. तिथून तो पैसे देतो सांगून वांजरी रोडवर घेऊन गेला व तिथे त्याने जयाचा निर्घृण हत्या केली.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.