सावधान…! मारेगावात दाखल झाले 3 ठग

तीन पत्तीत हातचलाखी करून शहरात अनेकांची फसवणूक

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगावात तीन ठग दाखल झाले आहे. हे ठग एका ठिकाणी पत्ते खेळत बसतात. त्यांचा गेम बघून आजूबाजूचे लोकही तिथे गोळा होतात. खेळ रंगात आला की बघणारे लोकही या खेळात सामिल होतात. मात्र त्या सामिल होणा-या लोकांना याची थोडीही कल्पना नसते की ते तिघेही ठग असून ते एकमेकांशी संगनमताने खेळत आहे. जेव्हा खेळणा-याचा खिसा रिकामा होतो तेव्हा हे तिघेही आपला गाशा गुंडाळतात. अशा प्रकारे तिघांनी शहरात अनेकांना गंडवल्याची चर्चा आहे.

पोळ्याच्या सणानिमित्त जुगार खेळण्याची प्रथा पुर्वापारपासून चालत आली आहे. शासनाने जुगारावर बंदी आणली असल्याने हा खेळ सध्या लपून छपून अवैधरित्या चालतो. हाच खेळ सध्या मारेगावात बाहेरगावाहून आलेल्या 3 ठगांनी सुरु केला आहे. त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक 3 व 4 येथे आपला पत्त्यांचा डाव मांडला होता. खेळात त्यांनी परिसरातील अनेकांना सामिल करून घेतले. डावात खेळणारे तिघे हे संगनमताने खेळत असल्याची कल्पना कुणालाच नव्हती. यात कुणी 5 हजार कुणी 10 हजार तर 20 हजारही हरल्याचे बोलले जात आहे. ही रक्कम 1.5 ते 2 लाखाच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. 

खुुण असेलेले पत्ते, विविध इशारे करून हे ठग खेळतात. त्यांचा मोठा डाव नसल्याने याबाबत जास्त चर्चा झाली नाही. मात्र इतर ठिकाणीही हे तिघेच खेळत दिसल्याने खेळात हरलेल्यांना गंडल्याचे लक्षात आले.  त्यांनी प्रभाग क्रमांक 3 ते 4 च्या अनेक नागरिकांना गंडवल्याची चर्चा सध्या शहरात रंगत आहे. 

या ठगांना स्थानिक मध्यस्थीची मदत?
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील एक व्यक्ती ही नांदेड येथील आहे तर दोन व्यक्ती या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील आहे. बाहेरगावाहून आलेली व्यक्त शहरात कुठेही बसून पत्त्यांचा खेळ मांडू शकत नाही. शिवाय कोणत्या भागातील लोक खेळू शकतात. याची सर्व माहिती त्यांना असते. त्यामुळे मारेगावातीलच एका मध्यस्थीच्या माध्यमातून हे ठग शहरात दाखल झाल्याचा अंदाज लावला जात आहे. शिवाय खेळ संपला की ते कुठे जातात याची देखील कुणालाही माहिती नाही. गेल्या 3-4 दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याचे स्थानिक सांगत आहे.

देशात जुगाराला बंदी आहे. त्यामुळे यात पैसे हरल्यानंतर कुठेही तक्रार केली जात नाही. याचाच फायदा हे ठग उचलत आहे. त्यामुळे याबाबत अद्याप कुणीही तक्रार केलेली नाही. मारेगाव पोलिसांनी काही दिवसांपूर्वी प्रभाग क्रमांक 4 मधील एका घरामध्ये सुरु असलेल्या जुगारावर कारवाई केली होती. अशीच कारवाई करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिक करीत आहे.

हे देखील वाचा:

स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही हटवांजरी (पोड) येथे रस्ता नाही

अखेर राजूर येथील बेपत्ता मुलाचा सापडला मृतदेह

Comments are closed.