भास्कर राऊत, मारेगाव: गणपती विसर्जनासाठी गेलेल्या गणेशभक्तांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. सालेभट्टी येथे ही घटना घडली. मधमाशांचा हा हल्ला ध्यानीमनी नसल्याने गणेशभक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. यात 15 ते 16 गणेशभक्तांना मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांना मारेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील सालेभट्टी येथे काही घरी दरवर्षी प्रमाणे गणपती स्थापना करण्यात आली होती. आज दि. 19 सप्टेंबरला विसर्जनासाठी नेहमीच्या ठिकाणी तलावावर न जाता गावातीलच बळीराम लोणसावळे यांच्या शेतामध्ये असलेल्या शेततळ्यामध्ये गणपतींच्या विसर्जनासाठी गेले. यांच्या शेतामध्येच मोहाचे एक मोठे झाड आहे. या झाडावर आग्या मोहोळ बसलेले होते.
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या कोणालाही याची किंचितही कल्पना नव्हती. अशातच या मोहाच्या झाडावरील मोहोळ उडाले आणि या मधमाशांनी सरळ गणेशभक्तांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने भाविक घाबरले आणि तिथून मिळेल त्या वाटेने पळ काढला. मधमाश्यांनी 15 ते 16 भक्तांना चावा घेतला. त्यांना मारेगाव येथे दवाखान्यात आणण्यात आले. येथे उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आली. थोडक्यात निभावल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
तलावातील पाणी गढूळ असल्याने गावातील लोकांनी नेहमीच्या तलावावर न जाता शेतकऱ्यांच्या शेतातील शेततळ्यामध्ये न्यायची वेळ आली. गावातील प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली असून भविष्यात असे प्रकार घडणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.