कुंभा येथील प्रभाग क्र. 2 सील, ग्रामीण भागात दहशत

38 व्यक्तींचे स्वॅब तपासणी साठी पाठवले

0

नागेश रायपुरे, मारेगाव: राजुर (कॉलरी) येथील पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात आलेला एक पुरुष शनिवारी पॉजिटव्ह आढळला. प्रशासनाव्दारा तात्काळ खबरदारी म्हणून कुंभा येथील प्रभाग क्र. 2 सील करण्यात आला आहे. कुंभा येथील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 38 व्यक्तींना कॉरन्टाईन करण्यात आले होते. यातील 27 व्यक्तींना पुरके आश्रम शाळा मारेगाव येथे संस्थात्मक कॉरन्टाईन व 11 व्यक्तींना होम कॉरन्टाईन कऱण्यात आले आहे. आज या 38 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळला पाठवण्यात आले आहे.

नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये – दीपक पुंडे
ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने परिसरातील नागरिकांनी अधिक काळजी व खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी कामा शिवाय बाहेर पडू नये, सामाजिक अंतर पाळावे, तोंडाला मास्क, रुमाल वापरावे. तसेच कुंभा येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या थेट संपर्कात ज्या कुणी व्यक्ती आल्या आहेत त्यांनी मनात कसलीही भीती न बाळगता स्वतःहून कोरोन्टाईन व्हावे किंवा प्रशासनास याची माहिती देऊन सहकार्य करावे.
– दीपक पुंडे, तहसिलदार मारेगाव

ग्रामीण भागात पसरली दहशत
वणी तालुक्यातील राजुर (कॉलरी) येथील एका 35 वर्षीय महिला नागपूर येथे उपचारासाठी गेली होती. तिथे ती कोरोना पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्या व्यक्तीच्या संपर्कात कुंभा येथील 3 व नेत (वरुड) येथील 11 असे एकूण 14 व्यक्ती संपर्कात आले होते. यातील एक व्यक्ती पॉजिटिव्ह निघाली आहे. आतापर्यंत कोरोनाचे रुग्ण शहरात आढळून येत होते. मात्र आता कोरोनाने ग्रामीण भागात सुध्दा शिरकाव केल्याने जिल्ह्यातील खेडोपाडी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गाव खेड्यात कोरोनाच्या चर्चा रंगत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.