जितेंद्र कोठारी, वणी: दोन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरला नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आरोग्यविभागातर्फे ‘लॉक’ लावण्यात आले. कोविड केंद्रावर काम करणाऱ्या सर्व डॉक्टर नर्स यांना पूर्वीच्या पदस्थापनावर पाठविण्यात आले तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णवाढ पूर्वीपेक्षा कमी होत आहे. तसेच कोरोना संसर्ग झालेले रुग्ण ‘होम आयसोलेशन’ पर्याय स्वीकारत असल्याने शासनाने कोविड केअर बंद करण्याच्या निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
वणी येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर असताना कोविडरुग्णांसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. वणी येथे कोविड केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी 5 ऑक्टोपासून उपोषण सुरू केले होते. मनसेच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी मागणी मान्य करीत ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत 25 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले.
कोविड चाचणी व सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड केंद्रात दोन डॉक्टर, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, औषध वितरक यांची प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली. तसेच कंत्राटी पद्धतीने काही कर्मचारी व सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत असल्यामुळे शासनाने निम्याहून अधिक कोविड केअर सेंटर बंद करण्याचे आदेश काढले. त्या अनुषंगाने वणी येथील कोविड केंद्र शुक्रवारपासून बंद करण्यात आले. मात्र वणी येथील कोविड केंद्र बंद झाल्याने येथील कोविडच्या संशयित रुग्णांना आता कोविड चाचणी व उपचारासाठी पांढरकवडा किंवा यवतमाळ येथे जावे लागणार आहे.
डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल होणार बंद
खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यास इच्छुक रुग्णांसाठी येथील लोढा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र आता रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे कोविड उपचार केंद्र सुरू ठेवणे परवडत नाही. त्यामुळे लोढा हॉस्पिटलचे संचालक डॉ. महेंद्र लोढा यांनी शासनाकडे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बंद करण्याची परवानगी मगितल्याची माहिती आहे.
कोविड केअर सेंटर बंद करणे चुकीचे आहे.
वणी शहरात व तालुक्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ पाहायला मिळत आहे. अश्यात शासनाने कोविड केअर सेंटर बंद करणे चुकीचे आहे. कोविड सेंटर परत सुरू करण्यासाठी मनसे शासनाकडे मागणी करणार आहे. वेळ पडल्यास पुन्हा आंदोलन करण्याची मनसेची तयारी आहे.
राजू उंबरकर, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा