वणी पोलीसांची रेती तस्करांविरुद्ध धडक कारवाई

अवैध रेती वाहतूक करताना 3 हायवा ट्रक जप्त

0

जितेंद्र कोठारी वणी : तालुक्यात बिनधास्त सुरू असलेली रेती तस्करी विरुद्ध वणी पोलिसांनी धडक कारवाई करून शनिवारी अवैध रेती वाहतूक करताना 3 हायवा ट्रक जप्त केले. वणी-वरोरा मार्गावर गुंजाच्या मारोती मंदिरासमोर शनिवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

ट्रक पकडल्यानंतर पोलिसांनी वणी तहसीलदारांना पाचारण करून पुढील कारवाईसाठी पकडलेले ट्रक त्यांच्या ताब्यात देण्यात आले. मागील 15 दिवसांतली पोलिसांची रेती तस्करीविरुद्ध ही दुसरी मोठी कारवाई आहे.

वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांना मिळालेल्या माहितीवरून डीबी पथकाने शनिवारी दुपारी 12.30 वाजता दरम्यान वणी-वरोरा मार्गावर सापळा रचला. थोड्याच वेळात वरोराकडून येणाऱ्या एका हायवा ट्रकला थांबवून तपासणी केली असता त्यात 6 ब्रास रेती भरून आढळली.

त्या ट्रकच्या पाठोपाठ येणाऱ्या इतर दोन हायवा ट्रकची तपासणी केली असता त्यातही रेती भरून होती. पोलिसांनी तिन्ही ट्रकच्या चालकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कारवाईसाठी महसूल अधिकाऱ्यांना मोक्यावर पाचारण केले. रेती भरलेले हायवा क्र. (MH34 BG 4753) (MH34 BG4123) व (MH 34 AH6611) ट्रक त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसताना बेधडक व दिवसरात्र सुरू असलेल्या रेतीतस्करीविरुद्ध महसूल विभाग मूग गिळून गप्प बसले आहे. तर महसूलचे कर्तव्य पोलीसविभाग पार पाडताना दिसून येत आहे.

17 डिसें. रोजी वणी पोलिसांच्या डीबी पथकाने वणी-घुग्गुस मार्गावर कारवाई करीत छत्तीसगड राज्याच्या रॉयल्टीवर रेती वाहतूक करताना दोन हायवा ट्रक पकडले होते. त्या दोन्ही वाहनांवर महसूल विभागाने 5 लाख 88 हजारांचे दंड ठोठावले होते. दोन दिवसांपूर्वीच सदर दोन्ही ट्रक सोडण्यात आले असता पोलिसांनी आज पुन्हा 3 हायवा पकडून रेती तस्करांना आव्हान दिले आहे. पकडण्यात आलेल्या रेती वाहनांवर महसूल विभाग काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रेती तस्करांवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचे हायकोर्टाचे आदेश ?

रेती तस्करीच्या शक्य त्या प्रकरणामध्ये रेती माफियांविरुद्ध ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999) व एमपीडीए कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी. असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहे. परंतु वणी विभागात आजपर्यंत एकाही रेतीमाफियावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली नाही.

हेदेखील वाचा

रागाच्या भरात महिला निघाली घरून निघून

हेदेखील वाचा

 वणी येथील कोविड केअर सेंटर ‘लॉक’ 

Leave A Reply

Your email address will not be published.