विलास ताजने (मेंढोली):- गत दहा दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके धोक्यात आली आहे. तीव्र उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. परिणामी आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
वणी तालुक्यात ७ ते १० जून पर्यंत सलग चार दिवस पाऊस पडला. त्यामुळे शेतकामाला वेग आला होता. परंतु नंतर पावसाने वीस दिवस दडी मारल्यामुळे पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलैच्या मध्यंतरी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मात्र सलग आठ दिवस संततधार पडलेल्या पावसाने कापसाच्या पेरण्या उलटल्या. दुबार, तिबार पेरणी करावी लागली.
परंतु याच काळात पिकात तणें वाढली. परिणामी पिकातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी तणनाशकांवर शेतकऱ्यांना खर्च वाढला. मजुरांच्या द्वारे निंदन करून शेत स्वच्छ करावे लागले. मात्र पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे जमिनी कडक झाल्या. त्यामुळे शेतमशागत करणे कठीण झाले. काही शेतकरी तिबार पेरणीसाठी पावसाची वाट बघत राहिले.
दीर्घकाळ पाऊस नसल्याने जमिनीला तडे गेले. परिणामी पिकांची वाढ रोखली. सध्या कपाशीला पात्या, फुले येत आहे. सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे. येत्या दोन तीन दिवसात पाऊस पडला नाही तर पिकांची अवस्था बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.