दारूला चढू शकते ‘कोरोनाची नशा’!

दारुच्या अवैध गुत्यांमधून कोरोना प्रसाराची भीती

0

विलास ताजने, वणी: दारूच्या अवैध गुत्त्यांवरून कोरोना प्रसाराची भीती वाढत आहे. दारूलाच कोरोनाची नशा चढेल काय ही अशीही परिस्थिती निर्माण होत आहे. सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने आपत्ती व्यवस्थापन धोरणाअंतर्गत नियमावली तयार केली. सदर नियमावलीचे सर्वांनी पालन करणे सक्तीचे केले आहे. काही सुज्ञ लोकांकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमांचे पालन केले जात आहेत. मात्र अवैध धंद्यांच्या ठिकाणी सुरक्षेचे तीनतेरा वाजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दारूचे अवैध गुत्ते कोरोनाच्या प्रसाराला पोषक ठरू पाहत आहे. दारूच्या अवैध गुत्त्यांवरील गोंधळ पाहता दारूचा एकच प्याला अनेक जीवांना घातक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी अवैध दारू, मटका आदी गुत्त्यांना पायबंद घालण्यासाठी शासन, प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी कठोर पावलं उचलण्याची नागरिकांची मागणी आहे.

वणी तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. काही बाधित वृद्धांसह तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे भीतीयुक्त परिस्थिती निर्माण झाली आहे. साध्या आजारांच्या रूग्णांवर देखील खासगी डॉक्टर इलाज करण्यास टाळाटाळ करीत आहेत. आधी कोरोना चाचणी करा. मग पाहू म्हणून रुग्णांना कोविड केंद्रात पाठवीत आहे. अशा वेळी योग्य उपचार न मिळाल्याने कोरोना निगेटिव्ह असलेल्या लोकांनाही आपला जीव गमवावा लागत असल्याचं वास्तव आहे.

अशा भयावह परिस्थितीतही परवानाधारक दारुविक्रीसह मटका, जुगार आदी अवैध धंदेही जोमात सुरू असल्याचे वास्तव आहे. लहानमोठ्या बाजारपेठेची गावे, स्टोनमाईन्स, कोलमाईन्स परिसर यांसह तालुक्यातील बहुतांश खेड्यापाड्यांत चोरट्या मार्गांनी दारूची विक्री केली जात असल्याचं चित्र स्पष्ट आहे. सदर अवैध धंदे गावपातळीवरील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दृष्टीस पडत नाही का? असा प्रश्नही उपस्थित होत आहेत. गावसुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही मूग गिळून गप्प का बसलेत ?

कोरोना प्रसाराच्या प्रारंभी पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांतून गावात आलेल्या विद्यार्थ्यांना, लोकांना प्रतिबंध घालणारे आज गप्प का? परवानाधारक दारूच्या दुकानात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नियमावलीनुसार आवश्यक उपाय करीत असल्याचे स्पष्ट आहे. परंतु चोरट्या मार्गांनी होणाऱ्या दारूच्या अवैध विक्रीच्या गुत्त्यांवर स्वच्छता, सामाजिक अंतराचे तीनतेरा वाजत आहे. अवैध दारूच्या गुत्त्यांवरील एकच प्याला अनेक जीवांना घातक ठरू पाहतो आहे.

प्रारंभी परदेशात, मुंबई, पुणे आदी शहरांत असलेला कोरोना आज आपल्या घराशेजारी नव्हे तर आपल्या घराच्या उंबरठ्यावर उभा ठाकला आहे. मृत्यूपूढे वैद्यकशास्त्रही पराभूत आहे. म्हणून कोरोनाच्या काळात सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची वेळ आहे.

 

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.