मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा

सरसकट 50 हजारांच्या मदतीची स्वराज्य संघटनेची मागणी

भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. तसेच नजर आणेवारी जी 59 पैसे दाखवण्यात आलेली आहे ती रद्द करून 50 पैशाच्या खाली दाखवावी. सोबतच सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावी, अशी मागणी मारेगाव स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मारेगाव तालुक्यात सततच्या मुसळधार पावसाने शेती आणि शेतकरी यांचे अतोनात नुकसान केलेले आहे. अनेकांचे काढणीस आलेले सोयाबीन जागेवरच खराब झाले. तर कापूस पिकाचेही मोठे नुकसान झाले. कपाशीची बोंडेही जागेवरच सडायला लागली होती. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सततच्या पावसामुळे बोंडेही काळी पडली होती. आणि कपाशी तसेच सोयाबीन ही दोन्ही पिके घरी कशी न्यायची याचीच चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे.

तुरीचे पीकही अर्धे अति पावसाने जळाले असून शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत सापडलेला आहे. अशातच आताची नजर आणेवारी ही 59 पैसे दाखवण्यात आलेली असून ही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे अशातलाच प्रकार वाटत आहे. संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत करण्यात यावी. तसेच नजर आणेवारी ही 50 पैशाच्या खाली दाखवून तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी स्वराज्य शेतकरी युवा संघटना मारेगावचे वतीने तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

31 ऑक्टोबरपर्यंत सुधारित आणेवारी जाहीर होणार – ना. तहसीलदार
59 पैसे आणेवारी ही सुरुवातीची घेण्यात आलेली आहे. सुधारित आणेवारी ही 31 ऑक्टोबर पर्यंत जाहीर करण्यात येते. त्यानंतर 31 डिसेंबर पर्यंत ही अंतिम आणेवारी जाहीर केल्या जाते. यासाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद तसेच कृषी विभाग हे तिन्ही विभाग मिळून मंडळानुसार सरासरी उत्पन्न ठरवून त्यानुसार आणेवारी ठरविली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता अंतिम आणेवारी येईपर्यंत कोणतीही आणेवारी ही ग्राह्य धरल्या जात नाही.
– आर. बी. खिरेकर, नायब तहसीलदार, मारेगाव

उपस्थित नायब तहसीलदार आर. बी. खिरेकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकर, जिल्हाप्रमुख सचिन पचारे, विशाल किन्हेकर, सोमेश्वर गेडाम, विजय मेश्राम, तुकाराम वासाडे, विकास राऊत यांच्यासाहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा:

मध्यरात्री घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये नवरात्री स्पेशल ‘बिग धमाका’ ऑफर लॉन्च

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.