सहकारी बँक कॉलनीमध्ये रस्ता बांधकामात दिरंगाई

पावसाळ्यात नागरिकांचे घराबाहेर निघणे झाले कठीण.... भूमिगत नालीचे बांधकाम निकृष्ठ असल्याचा आरोप

0

जितेंद्र कोठारी, वणी: नांदेपेरा मार्गावरील सहकारी बँक कॉलनी (आयटीआय) मधील रस्त्याचे बांधकाम अत्यंत संथगतीने होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. कंत्राटदारानी ऐण पावसाळ्यात रस्ता खोदून ठेवल्यामुळे नागरिकांना वाहन चालविणे व पायदळ निघणे कठीण झाले आहे. रस्त्याचे बांधकाम त्वरित पूर्ण करणे व निकृष्ट दर्जाचे नाली बांधकाम पुन्हा करण्याची मागणी बँक कॉलनी वासीयांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देण्यात आले. येत्या 10 दिवसात रस्त्याचे काम न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बँक कॉलनी येथील नागरिकांनी निवेदनात दिले आहे.

प्राप्त माहितीनुसार खनिज विकास निधी अंतर्गत वणी नांदेपेरा रोड ते निमकर अपार्टमेंट पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरणचे कंत्राट यवतमाळ येथील चिद्दरवार कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. यांना देण्यात आले. 95 लाख 36 हजार 497 रुपयांच्या निधीतून 595 मीटर लांब व 5 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने 1.20 मीटर पेव्हर ब्लॉक व एका बाजूने भूमिगत नाली बांधण्याचे काम कंत्राटदारांनी 300 दिवसाच्या कालावधीत करावयाचे करार झाले. सार्वजनिक बांधकाम विभागानी फेब्रुवारी 2020 मध्ये कार्य आरंभ करण्याचे आदेश (वर्क ऑर्डर) कंत्राटदार कंपनीला दिले.

वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर तब्बल 8 महिन्यानंतर 20 ऑक्टो. 2020 रोजी कंत्राटदारांनी ड्रेनेजच्या कामाला सुरवात केली. मात्र फक्त 18 दिवसानंतर 8 नोव्हे. 2020 रोजी काम बंद करण्यात आले. सदर कंत्राटदार कंपनीने 2 महिन्यानंतर 10 जानेवारी 2021 रोजी पुन्हा नाली बांधकाम सुरु केले. परंतु भूमिगत ड्रेनेजच्या कामात वापरण्यात आलेले सिमेंट पाईप व चेंबरवरील झाकणे अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे नागरिकांनी कामावरआक्षेप घेतला. त्यामुळे कंत्राटदारांनी अर्धवट झालेल्या नाली बांधकामावर माती टाकून 15 फेब्रुवारी नंतर काम बंद केले.

कंत्राटदार कंपनीने कॉलोनीचा संपूर्ण रस्ता जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवला. मात्र त्या रस्त्यावर मुरुम किंवा गिट्टी टाकण्यात आली नाही. मागील एका आठवड्यापासून शहरात संततधार पाऊस सुरु असल्यामुळे सदर रस्त्यावर चिखल पसरला आहे. सहकारी बँक कॉलॉनी येथील नागरिकांनी कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी यांना फोन करून समस्या सांगितली असता त्यांनी उद्धट भाषेत उडवाउडवीची उत्तर दिली.

अखेर त्रस्त झालेले नागरिकांनी 14 जून रोजी उपविभागीय अभियंता सा.बा. विभाग वणी याना निवेदन देऊन आयटीआय कॉलोनी मधील रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी केली. येत्या 10 दिवसात रस्ता दुरुस्त न केल्यास वणी नांदेपेरा मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात दिला आहे. तसेच निवेदनाची प्रत केंद्रीय राजमार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, कार्यकारी अभियंता सा.बा. विभाग पांढरकवडा यांनाही पाठविण्यात आली आहे.

कालावधी संपुष्टात पण काम फक्त दहा टक्केच !
वणी शहरातील निमकर अपार्टमेंट ते वणी नांदेपेरा रोड रा.मा. क्र. 317 पर्यंत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण, भूमीगत नाली व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे कामासाठी कंत्राटदार चिद्दरवार कन्स्ट्रक्शन प्रा. लि. यवतमाळ यांना जा. क्र. 649 दि. 05.02.2020 नुसार कार्यारंभांचे आदेश देण्यात आले. काम सुरु करण्याचा आदेशापासून 300 दिवसाच्या (पावसाळ्यासह) काम पूर्ण करण्याची कालावधी देण्यात आली. मात्र आदेशापासून 500 दिवस उलटले असता फक्त 10 टक्के काम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे कामाची कालावधी संपली तरी कामाला मुदतवाढ देण्यात आली का नाही याबाबत कार्यकारी अभियंता सा. बा. विभाग प्रकाश बूब, उप विभागीय अभियंता वणी तुषार परळीकर आणि कनिष्ठ अभियंता अक्षय लोये यांनी अनभिज्ञता दर्शविली.

हे देखील वाचा:

अबब…! एक दिवसात केला तब्बल 600 ब्रासचा रेतीसाठा

चोरट्यांचा चिखलगाव येथील कृषी केंद्रावर डल्ला

देशी दारूभट्टी समोर थरार, तरुणावर दगडाने हल्ला

Leave A Reply

Your email address will not be published.