कोरोनाच्या काळातही ‘हा’ अधिकारी प्रीतीत गुंग

0
96
प्रातिनिधिक फोटो

जब्बार चीनी, वणी: सध्या कोरोनामुळे इतर अधिकारी कर्तव्यात कोणतीही कसूर न ठेवण्याची काळजी घेत असताना मात्र एका विभागातील कार्यरत एक अधिकारी मात्र वेगळ्याच ‘प्रीती’त गुंग असल्याचे दिसून येत असल्याने संबंधीत विभागात खमंग चर्चा रंगली आहे. परिणामी अधिका-याचा वेगळ्यात ‘कामा’त जास्त रस असल्याने विभागातील सेवेचा बोजवारा उ़डाला आहे व त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

‘कर’ नाही त्याला ‘डर’ कसला ही उक्ती सर्वांच्याच परिचयाची आहे. मात्र नावातच कर असल्याने संशय येण्याचा कोणताही डर न बाळगता ‘करो’ना व्यवस्थापनावरच त्यांचा अधिक जोर असतो. कार्यालयात महिला आली की ‘चलो कॅबिन’ अशी भूमिका घेतली जाते. दुपारी 12 नंतर या कार्याला अधिकच बहर येतो. कारण तेव्हा या विभागातील गर्दी ओसरलेली असते. महिलांना आत कॅबिनमध्ये घेऊन तिथेच गोडी गुलाबी करणे, त्यांना नंबर देणे किंवा घेणे असे प्रकार सुरू असतात. तासंतास बसल्यानंतर गप्पा गोष्टीत ‘चहा’-‘पोहे’ असा ‘नाष्टा’ही तिथेच उरकवला जातो.

या प्रकारामुळे सर्वच कर्मचारी त्रस्त झाले आहेत. महिला कर्मचारी तर अशा प्रकारामुळे अधिकच संतप्त आहेत. कोरोनाच्या काळात अधिक तत्परतेने कार्य अपेक्षीत आहे. विभागात कसे काम सुरू आहे याची ‘तपासणी’ करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे त्यांचे दुर्लक्ष असून हाताखालच्या ‘वर्कर’बाबत त्यांच्या ‘आशा’ नेहमीच पल्लवीत झालेल्या दिसते. अशा सवयीमुळेच अधिका-यांकडून कर्तव्यात कसूर होत असून संबंधीत विभागातील सेवा ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचा आरोप कर्मचारी करीत आहे.

प्रातिनिधिक फोटो

विभागाची ‘अब्रु’ कर्मचा-यांच्या भरवश्यावर….
या विभागाचे नियोजन हाताखालच्या कर्मचा-यांवर ढकलले जाते. परिणामी सरदारच ‘चाल-ढकल’ करण्यात पुढे असल्याने कामाचा अधिक भार त्यांच्या सैन्यावर प़डलेला आहे. मात्र या आपत्तीत सर्वसामान्यांचे नुकसान होऊ नये म्हणून हे कर्मचारी ‘वॉरिअर्स’ होऊन इमाने ऐतबार आपले कर्तव्य पार पाडीत आहे. परिणामी एकीकडे अधिकारी स्वतःच्याच विभागाच्या अब्रुचे धिंडवडे काढण्यात गुंग असताना, कर्मचारी मात्र विभागाची काही प्रमाणात ‘अब्रु’ शाबुत ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.

कमी’शेण’ खाण्याचाही शौक…
या अधिका-याचा ‘3’ हा आवडीचा आकडा आहे. कोणत्याही कार्यालयात असे कमी अधिक प्रमाणात शेण खाण्याचे प्रकार काही नवीन नाही. मात्र त्याला कमी’शेण’ खाण्यातही चांगलाच रस असल्याची माहिती कर्मचा-यांकडून मिळत आहे. याच्या दराचा टक्काही त्यांचा आवडता असा ‘3’च असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र दुसरा कोणताही उपाय नसल्याने कर्मचा-यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. काही काळापूर्वी इथे बाहेरगावाहून एक कर्मचारी ‘विशेष’ सेवा देण्यासाठी यायचे. मात्र त्यांच्या पैशाच्या बाबतीत नेहमीच ‘भुल’ देण्याच्या सवयीमुळे त्यांनी देखील येणे बंद केले. त्यामुळे याचा मोठा परिणाम या विभागातील सेवेवर होऊन त्यामुळे झालेले नुकसान आजही हा विभाग झेलत आहे.

सध्या कोरोनामुळे सर्वच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र एक करून या आपत्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र या अधिकारी महाशयांचा विभाग मात्र कामा ऐवजी ‘भोंगळ’ कामामुळे बदनाम होत आहे. या अधिका-याच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळेच हा विभाग टिकेचा चांगलाच धनी झाला आहे. या आधी या विभागाच्या काहीच तक्रारी नव्हत्या असे नाही. पण कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अधिक तत्परतेने काम करणे अपेक्षीत असताना तिथली सेवा व्हेंटिलेटरवर दिसत आहे.

लोकांना आपल्या गावाबाबत एक कळवळा असतो, आपुलकी असते. व्यवस्था परिवर्तन करून परिसरात योग्य ती सेवा देऊन कायापालट करण्याची जिद्द अनेक अधिका-यांमध्ये असते. मात्र याचा विसर या अधिका-याला पडलेला आहे. कोरोनाच्या काळ हा लोकांच्या जीवन मरणाचा काळ आहे. अशा वेळी अधिकारी वर्गाने तत्पर राहणे गरजे आहे. ते कामात तत्पर असले तेव्हाच त्यांच्या हाताखालील कर्मचारी वर्गही तेवढ्याच जोमाने कामाला लागतो. त्यामुळे कोरोनाच्या अशा महामारीच्या काळात तरी या अधिका-याला सद्बुद्धी येवो अशी अपेशा संबंधीत विभागातील कर्मचारीवर्ग आणि सर्वसामान्य व्यक्त करीत आहे.

Previous articleपोलीसच सापडला दारू तस्करीत, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त
Next articleखुशखबर… ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी 2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Loading...