नीलेशच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, रासावासीयांची मागणी
खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचीही मुख्यमंत्र्यांकडे मागणी
जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील रासा येथील नीलेश सुधाकर चौधरी (32) या होतकरु युवकाची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना व खुनाचा कट रचणारी नीलेशची पत्नी सपना हिला फाशीची शिक्षा द्या. अशी मागणी रासा येथील तब्बल 400 ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नीलेश चौधरी हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा व शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणीही रासा येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी वणी यांना दिलेल्या निवेदनातून मुख्यमंत्रांकडे केली आहे.
रासा येथील नीलेश सुधाकर चौधरी या तरुणाचा दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी फुलोरा जंगलात गळफास घेतल्या अवस्थेत मृतदेह मिळाला होता. प्रथमदर्शनी नीलेश यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. मात्र मृतक नीलेशच्या अंगावर खरचटल्याचे व्रण असल्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलविली. पोलीस तपासात निलेशच्या पत्नीचे रासा येथीलच चंद्रशेखर दुर्गे या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
तपासला गती देत पोलिसांनी 16 सप्टेंबर रोजी चंद्रशेखर दुर्गे व एक विधिसंघर्ष बालकासह 4 जणांना अटक केली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपी चंद्रशेखर दुर्गे यांनी सपना व त्याच्या संबंधात निलेश अडसर ठरत असल्याकारणाने त्याला ठार मारून आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच नीलेशला संपविण्याचा कट निलेशच्या पत्नी सपना हिने रचल्याची माहितीही दुर्गे यांनी दिली. आरोपच्या कबुलीजबाब वरुन पोलिसांनी 18 सप्टेंबर रोजी निलेशची पत्नी सपना निलेश चौधरी हिला अटक केली होती.
नीलेश चौधरी हत्याकांड हा ‘ब्लाइंड मर्डर’ केस असताना डीबी प्रमुख सपोनि आनंदराव पिंगळे यांनी ज्या तत्परतेने या हत्याकांडाचा छडा लावला त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पूज्जलवार, पोलीस निरीक्षक शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख एपीआय आनंदराव पिंगळे, एपीआय माया चाटसे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, हरेंद्र भारती, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, मोहम्मद वसीम आदींनी या हत्याकांडाचा छडा लावून आरोपीना अटक केली होती.
हे देखील वाचा:
Comments are closed.