भास्कर राऊत, मारेगाव: प्रेयसी प्रियकराच्या नात्यातीलच होती. एकदा तो तिच्या घरी पाहुणा म्हणून गेला. त्यांचे सुत जुळले. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान प्रेयसी गर्भवती राहिली. प्रेयसीने याबाबत प्रियकराला माहिती देताच प्रियकराने हात वर करत ‘तो मी नव्हेच’ भूमिका घेतली. अखेर प्रेयसीने आरोपी प्रियकर विरोधात पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली.
सविस्तर वृत्त असे की संशयीत आऱोपी अरुण रामकिसन बोन्द्रे (25) हा सोनूपोड येथील रहिवाशी आहे. त्याच्या गावापासून जवळच त्याचे एक नातेवाईक राहतात. एप्रिल 2021 रोजी तो नातेवाईकाच्या घरी पाहुणा म्हणून गेला होता. नातेवाईकाच्या घरी एक तरुण मुलगी (21) होती. दोघांची नजरानजर झाली. पाहुणचार झाल्यानंतर प्रियकर गावाला निघून गेला. मात्र जाताना दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले.
गावाला गेल्यानंतर त्यांचे मोबाईलवर बोलणे सुरू झाले. त्यांच्या प्रेमाला चांगलाच बहर आला. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान त्याचे मुलीच्या गावी जाणे येणे वाढले. नात्यातीलच असल्याने पीडितेच्या कुटुंबीचा प्रियकरावर संशय आला नाही. तो घरी येत असल्याने त्याने देखील प्रेयसीला कधी तुम्ही पण घरी या असे आमंत्रण दिले.
15 एप्रिल रोजी प्रियकराने प्रेयसीला घर दाखवतो असे सांगत सोनूपोड येथे स्वत:च्या घरी बोलावले. नातेवाईकच असल्याने प्रेयसीच्या आईवडिलांनीही परवानगी दिली. प्रेयसी प्रियकराच्या घरी पोहोचली. तिथे प्रियकराने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो पीडितेचे आई वडिल नसताना वारंवार तिच्या घरी जायचा. या काळात त्याने अनेकदा मुलीचे शोषण केले. असा पीडितेचा आरोप आहे.
दरम्यान पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे प्रेयसीने प्रियकराला याबाबत माहिती देत लग्नाबाबत विचारणा केली. मात्र प्रियकराने ‘तो मी नव्हेच’ म्हणत हात वर केले. त्यानंतर तिने अनेकदा प्रियकराला लग्नाबाबत विचारले मात्र प्रियकर कायम लग्नाची गोष्ट टाळत होता.
अखेर पीडितेने ही बाब आपल्या आईवडिलांना सांगितली. त्यांनी याबाबत तक्रार करण्याचे ठरवत मारेगाव पोलीस ठाणे गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयीत आरोपी अरुण रामकिसन बोन्द्रे (25) याच्याविरोधात भादंविच्या कलम भादंविच्या कलम 376 (2 N) व 417 नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास ठाणेदार जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल चौधऱी करीत आहे. तक्रार देण्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झाला आहे.
हे देखील वाचा: