नोकरी आणि पैशावर दावा करणा-या तोतया पत्नीवर गुन्हा दाखल

मृत इंजिनियरचा वारसा सांगून केला होता दावा

निकेश जिलठे, वणी: मंडपात लग्न सोहळा सुरू असतो… त्याच वेळी अचानक लग्नात एक महिला अंगाखांद्यावर दोन मुलं घेऊन येते…  आणि म्हणते… हे लग्न थांबवा… कारण नवरदेवाशी माझे आधीच लग्न झाले आहे… ही दोन मुलं नवरदेवाची आहे, हा सिन आपण सिनेमात नेहमीच बघितला असेल. मेलोड्रामा म्हणून या सिनचा अनेकदा वापर होतो. असाच काहीसा प्रकार वणीत घडला आहे. मृत झालेल्या एका अविवाहित इंजिनियरची पत्नी असल्याची बतावणी करून अनुकंपावरील नोकरी आणि पैशावर दावा करणा-या तोतया पत्नीचे बिंग फुटले. खोटे प्रमाणपत्र सादर करून पत्नी असल्याची बतावणी करणा-या या महिलेवर वणी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की कुणाल (बदललेले नाव) ते वणी येथील रहिवासी होते. ते अविवाहित होते. चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावी सार्वजनिक बांधकाम विभागात ते इंजिनियर पदावर कार्यरत होते. 2022 च्या जानेवारी महिन्यात कुणालचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 40 होते. कुणालच्या मृत्यू नंतर त्याच्या कुटुंबीयांनी अनुज्ञेय लाभ (वारशाला मिळणारा कायदेशीरित्या लाभ) मिळावा यासाठी न्यायालयात वारसा प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. मात्र त्याच वेळी या प्रकरणात एका महिलेची एन्ट्री होते. तिने ती कुणालची पत्नी असून नोकरी आणि सर्व लाभ तिलाच मिळावे, असा दावा केला. तसेच कुणालच्या कुटुंबीयांना दिल्या जाणा-या वारसा प्रमाणपत्राला आक्षेप घेतला.

महिलेची एन्ट्री आणि कहानी में ट्विस्ट….
आरोपी महिला (वय 40) ही हल्ली नागपूर येथे राहते. त्याआधी ती वणी येथे राहत होती. 2007 मध्ये नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात तिचे कुणालसोबत लग्न झाले, त्यानंतर कुणालपासून तिला दोन मुलं झाले, असा दावा तिने केला. कुणालच्या मृत्यूनंतर तिला नोकरीचा लाभ मिळावा तसेच मृत्यू नंतर मिळणा-या इतर आर्थिक लाभावर तिने दावा केला. यासाठी ती कोर्टात गेली.

असे फुटले महिलेचे बिंग..
कुणालच्या कुटु्ंबीयांच्या माहिती प्रमाणे सदर महिला ही वणीतील रंगारीपुरा येथे एका इसमासोबत 2020 पर्यंत राहत होती. त्या इसमापासून तिला दोन मुलं झाले. या मुलांची डिलेव्हरी वणीतीलच एका खासगी रुग्णालयात झाली. याची नोंद चिखलगाव ग्रामपंचायतीमध्ये होती. ही नोंद कुणालच्या कुटुंबीयांनी पुरावा म्हणून सादर केला. शिवाय गणेश टेकडी मंदिर येथे कोणत्याही प्रकारचे लग्न होत नाही व आजपर्यंत कोणतेही लग्न येथे झाले नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली. तसेच ज्या तारखेला लग्न झाल्याचा दावा केला आहे. त्या तारखेला कुणाल हा नोकरीवर हजर होता. असे विविध पुरावे कुणालच्या कुटुंबीयांनी सादर केल्याने तोतया पत्नीचे बिंग फुटले.

महिलेचे बिंग फुटताच कोर्टाने कुणालच्या कुटुंबीयांच्या बाजूने निकाल दिला. तसेच तोतया पत्नीवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून वणी पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात भादंविच्या 199. 201, 420, 467, 468, 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव ट्रकने चिरडले महिलेला, महिलेचा जागीच मृत्यू

बॉक्स ऑफिस दणाणून सोडणारा सालार आजपासून वणीत

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.