ऐन दिवाळीत भूमिहिन, निराधार राजूचे घर आगीत जळून खाक

नुकतेच आई वडिल गमावलेल्या राजूवर आणखी एका संकटाची भर

भास्कर राऊत, मारेगाव: कोरोना महामारीत राजूने आपले आईवडील गमावले. घरातील मुख्य आधार हरपला. त्यानंतर भूमीहिन असलेला राजू मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. आधीच मोठे धक्के पचवलेल्या राजूवर ऐन दिवाळीत आणखी एका संकटाची भर पडली. त्याच्या घराला आग लागून घरातील उपयोगी साहित्य व मजुरीतून कमावलेले 5 हजार रुपये जळून खाक झाले. तालुक्यातील गोंड बुरांडा येथे ही घडली.

गोंड बुरांडा येथे राजू महादेव आसूटकर राहतो. संकट यायला लागली की कशी एकामागून एक येत असतात याचा चांगला अनुभव राजूला आला. कोरोनाच्या महामारीत राजूने आईवडील गमावले. राजू हा भूमिहीन आहे. कसाबसा मोलमजुरी करून तो जगत आहे. दिवाळी हा प्रकाश आणि तेजाचा दिवस. दर दिवाळीला घरी त्याची आई पणत्या लावायची. मात्र आईवडिल गमावल्याने त्याचे जीवन अंधारमय झाले होते. दिवाळीच्या निमित्ताने आपली झोपडी प्रकाशमान होईल यामुळे राजू संपूर्ण दिवाळीत रोज घरी दिवे लावायचा.

दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबिजेच्या दिवशी दि. 26 ऑक्टोबरला राजुने नेहमीप्रमाणे आपल्या घरी दिवे लावले आणि तो बाजूलाच असलेल्या पानटपरीवर गेला. मात्र एवढ्याच वेळात घराला आग लागली. या आगीमध्ये गृहउपयोगी साहित्य, अनाज, टीव्ही, टेबल, अंथरुणाचे साहित्य, सोबत मजुरीचे ठेवलेले 5 हजार रुपये हे सारे साहित्य जळून खाक झाले. दिव्याची वात उंदीर अथवा इतर वस्तूने आग घरात नेली व आग लागली असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मजुरीच्या भरोशावर आपली गुजरान करणाऱ्या एका गरीबाच्या घरातील सर्व साहित्य जळल्याने राजुवर आभाळ कोसळल्यागत संकट आले आहे. आईवडिलांचे छत्र आधीच हरवलेल्या राजुला शासनाने मदत करावी असा सूर सगळीकडून उमटत असून राजुने यासंदर्भात मारेगाव तहसील येथे निवेदन देऊन आर्थिक मदतीची मागणी केलेली आहे.

हे देखील वाचा: 

फक्त एका वॉट्सऍप मॅसेजने पदवीधर मतदार यादीत नाव नोंदवा…

दारु दुकानाच्या एनओसीसाठी लाखोंची उलाढाल ! कथित व्हायरल क्लिपने खळबळ

Comments are closed.