विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील एका घराला भीषण आग लागली. यात संपूर्ण घरच बेचिराख झाले. आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दोन तासानंतर आग विझवण्यात गावक-यांना यश आले. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी घरातील वस्तू जळून खाक झाल्या होत्या. यात घरमालकाचे सुमारे 5 ते 6 लाखांचे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्त असे की हरीदास धोबे पाटील (60) हे शिंदोला येथील रहिवासी आहे. ते त्यांची आई, पत्नी, मुलगा, सुन व नातवंडासह राहतात. त्यांची शिंदोला शिवारातच शेती आहे. शुक्रवारी दिनांक 15 डिसेंबर रोजी हरिदास यांच्या घरातील सर्व मंडळी शेतात गेली होती. या वेळी घरात त्यांची वृद्ध आई होती.
हरीदास चार खोल्यांच्या घर आहे. सध्या कापसाला योग्य तो भाव नसल्याने त्यांनी एका खोलीत कापूस ठेवलेला आहे. चार वाजताच्या दरम्यान हरीदास यांच्या वृद्ध आईला कापूस ठेवलेल्या खोलीतून धूर येताना दिसला. आग लागल्याचे लक्षात येताच त्या घरातून बाहेर आल्या व त्यांनी आरडाओरड करत शेजा-यांना बोलावले. मात्र कापसाने तात्काळ पेट घेत संपूर्ण घर कवेत घेतले.
अवघ्या काही वेळातच संपूर्ण घरात आग पसरली. या आगीत घरातील संपूर्ण फर्निचर, सोफा, दिवान, टीव्ही, फ्रिज, कपडे, कपाट, रोख रक्कम, दागिने व 22 क्विंटल कापूस जळाला. शेजा-यांनी मिळेल त्या साधनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात गावक-यांना यश आले. मात्र तो पर्यंत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
या घटनेत धोबे कुटुंबाचे सुमारे 6 लाखांचे नुकसान झाले. महसूल विभागाला घटनेची माहिती दिली आहे. आग कुठल्या कारणाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किंटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज धोबे कुटुंबीयांनी ‘वणी बहुगुणी’जवळ व्यक्त केला.
हे देखील वाचा:
मध्यरात्री बसस्थानक परिसरात आढळला संशयास्पद हालचाली करताना युवक
Comments are closed.