शिबला परिसरात आढळलेल्या जिवाष्मे आणि अष्म खांबांचे संवर्धन व्हावे
भूशास्त्र व पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांची मागणी
जितेंद्र कोठारी, वणी: नुकतेच झरी तालुक्यातील शिबला जवळ दुर्मिळ कोलमणार बेसाल्ट आढळले. ह्याच परिसरात शंख-शिंपल्याची आणि वनस्पतीची जीवाष्मेही आढळली आहेत. त्यामुळे ह्या स्थळाचे भौगोलिक महत्व वाढले असून हे स्थळ अभ्यासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरले आहे. ह्या दृष्टीकोनातून ह्या स्थळाचे संरक्षण होणे अत्यावश्यक असल्याची मागणी संशोधक व अभ्यासक प्रा सुरेश चोपणे यांनी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यात कोलमणार बेसाल्ट आढळल्याचे नुकतेच निदर्शनास आले होते, परंतु आता त्याच परिसरात सर्वेक्षण करताना 6 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या नद्या आणि गोड्या पाण्यातील शंख शिंपल्याची (Gastropods , Bevalves,) आणि वनस्पतींची जीवाष्मे (plant fossils) येथील भूशास्त्र आणि पर्यावरण अभ्यासक प्रा सुरेश चोपणे ह्यांना आढळली आहेत. (ह्यापूर्वी सुध्दा काही भूशास्त्र अभ्यासकांनी येथील जिवाष्माची नोंद केली आहे).
कोलमणार बेसाल्ट हा लाव्हारस पाण्याच्या संपर्कात आल्या मुळे थंड होऊन पंच-शट कोनिय खांब तयार झाले असे प्रा चोपणे यांनी दावा केला होता, ते या पुराव्या मुळे खरे ठरले आहे. परिसरात जीवाष्मे असल्याने त्या दाव्याला बळ मिळाले आहे. चंद्रपूर, यवतमाळ जिल्हा हा जलचर जीव, वनस्पती आणि प्राण्यांच्या जिवाष्मासाठी प्रसिद्ध आहे.
प्रा. चोपणे ह्यानी ह्यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, सुसरी,कळंब आणि मारेगाव तालुक्यात शंख शिंपळ्यांची जीवाष्मे शोधून काढली आहेत. विदर्भ परिसरात आजच्या सारखाच पाणी साठा तेव्हा सुद्धा मुबलक प्रमाणात होता आणि भरपूर प्राणी जीवन पण होते.मात्र 6 कोटी वर्षादरम्यान आलेल्या लावारासाच्या पुरामुळे ते जीवन नष्ट झाले आणि आज ते जिवाश्मांच्या रूपाने आपल्या समोर आहेत.
येथे गोड्या पाण्यातील शंख-शिंपले आणि वनस्पती चे जीवाष्मे आढळतात. भविष्यात संशोधनाच्या आणि संवर्धनाच्या दृष्टीने हे स्थळ महत्वाचे आहे. म्हणून येथील कोलमणार बेसाल्ट आणि परिसरातील जिवाष्माचे जतन होणे आवश्यक आहे. प्रा सुरेश चोपणे ह्यानी ह्यासाठी जिल्हाधिकारी यवतमाळ ह्यांना पत्र लिहून ह्या परिसराचे संवर्धन करण्याची विनंती केली आहे.
हे देखील वाचा: