सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. घरगुती आणि सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात उद्यापासून सुरू होईल. यंदा गणेशविसर्जन कसे आणि कुठे कराल? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. कोरोनाच्या सावटात सर्वांनीच काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने विसर्जनाची सिद्धता केली आहे.वामनघाटाजवळील भीमनगर ग्राउंडवर कृत्रिम विसर्जन तलाव आणि गाड्यांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. ही माहिती नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना दिली.
चौकाचौकांमध्ये विसर्जनरथांची व्यवस्था केली आहे. तसे पाहता दीड दिवसांपासूनच गणेशविसर्जनाला सुरुवात झाली. मंगळवारपासून घरगुती आणि सार्वजनिक विसर्जन तिथून दोन-तीन दिवस चालेल. नागरिकांनी घरातल्या घरातच विसर्जन करावे असे आवाहन निसर्ग आणि पर्यावरणप्रेमींकडून होत आहे. तशाप्रकारच्या सूचना नगरपालिका आणि प्रशासनाकडून लाऊडस्पीकरवरून गावात दिल्या जात आहेत.
गणपती विसर्जन घरी करावे असा आग्रह मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. म. गो. खाडे यांनी धरला. पोलीस विभागानेदेखील विसर्जनरथ तयार केला आहे. यंदा प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणपतींची संख्या नगण्य होती. त्यातही घरोघरीच विसर्जनाचा आग्रह सर्वांचा आहे. लोकांच्या उत्साहात कुठेच कमी नाही. महालक्ष्मी किंवा गणपती उत्सवदेखील घरच्या घरी झालेत.
मविपने आतापर्यंत आवाहन केले. त्याचा प्रभाव पडत आहे. लोक जागृत झालेत. मातीचे गणपती घरीच विसर्जित करा. तीच माती पुढील वर्षासाठी वापरावा. केमिकल रंगांचा वापर करू नका. मातीचेच गणपती बसवण्यासाठी लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. निर्माल्य नदीत किंवा पाण्यात विसर्जित न करता ते गोळा करावे. त्याचं खत तयार होतं. ते आपण घरातील बागेत वापरू शकता. तुलनेने यंदा ध्वनी आणि वायुप्रदूषण कमी आहे.
विविध चौकांमध्ये विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी दक्ष राहणे आवश्यक आहे. अनावश्यक गर्दी टाळलीच पाहिजे. नदी, जलाशय किंवा कृत्रिम विसर्जन तलावांवर गर्दी होणार नाही, याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घेतली आहे.
सहकार्य करा
जास्तीत जास्त आम्ही जनजागृतीवर भर दिला. विसर्जन घरीच करावं ही आमची अपेक्षा आहे. वामनघाटावर सोशल डिस्टन्सिंगसह पूजा आणि विसर्जन होईल. सॅनिटायझर आणि फवारणीची व्यवस्था राहील. सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत विसर्जन होईल. नागरिकांनीदेखील स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. गर्दी टाळावी. प्रशासनाला सहकार्य करावे.
– नगराध्यक्ष, तारेंद्र बोर्डे