पहाटे घडला थरार… चोरट्याचा पत्रकारावर हल्ला… अचानक समोर आल्याने रॉडने प्रहार

बंद घर समजून चोरट्याची घरफोडी... 15 हजारांची रोकड उडवली... वणीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

जितेंद्र कोठारी, वणी: बंद घर समजून चोरट्याने घरफोडी केली. मात्र घरातील व्यक्ती अचानक समोर आल्याने तारांबळ उडालेल्या चोरट्याने घरातील व्यक्तीवर रॉडने हल्ला करून पळ काढला. आज बुधवारी पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा थरार रंगला. या हल्ल्यात पत्रकार असलेले आसिफ शेख हे जखमी झाले आहे. शहरातील घरफोडीचे सत्र काही केल्या थांबत नसताना आता चोरट्यांचा हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. 

सविस्तर वृत्त असे की आसिफ शेख हे शहरातील गाडगेबाबा चौक येथे कुटुंबासह राहतात. ते वेकोलित नोकरीला असून सोबतच त्यांची पत्रकार म्हणूनही ओळख आहे. 11 ऑक्टोबरच्या रात्री ते त्यांच्या घराच्या तळमजल्याला लॉक करून वर पहिल्या माळ्यावर झोपले होते. दरम्यान दरवाज्याला कुलूप बघून घरात कुणीही नसल्याचे समजून चोरट्याने पहाटेच्या सुमारास घरात प्रवेश केला. चोरट्याने घरातील ऐवजावर डल्ला मारला व त्यानंतर तो वरच्या माळ्यावर चोरी करण्यास उद्देशाने जात होता.

पत्रकाराच्या डोक्यावर रॉडने हल्ला….
आसिफ यांना मॉर्निंग वॉकची सवय आहे. त्यामुळे ते पहाटे 5 वाजताच्या सुमारास पहिल्या माळ्यावरून पाय-यांनी तळमजल्यावर जात होते. त्याच वेळी चोर देखील चोरीच्या उद्देशाने वरच्या माळ्यावर जात होता. पाय-यावर आसिफ आणि चोर समोरासमोर आले. अचानक घरातील व्यक्ती समोर बघून चोरट्याने आसिफ यांच्या डोक्यावर रॉडने जोरदार प्रहार केला व तिथून पळ काढला.

चोरट्याच्या हल्ल्यात आसिफ यांना मोठी इजा झाली. त्यांना सुरुवातीला वणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी नेल्याची माहिती आहे. या घरफोडीत चोरट्याने 15 हजारांच्या रोख रकमेवर डल्ला मारल्याची माहिती आहे.

वणीत चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच
शहरात गेल्या एक ते दोन महिन्यांपासून सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहे. घर बंद दिसले की घरफोडी झालीच अशी परिस्थिती सध्या शहरात आहे. मात्र इतक्या दिवसानंतरही पोलिसांना अद्यापही चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यश आले नाही. घरफोडीनंतर चोरट्यांनी दुकानाकडेही आपला मोर्चा वळवला आहे. गेल्या आठवड्यात एका चोरट्याला पोलिसांनी पकडले होते. मात्र त्यानंतरही चोरीची घटना समोर आली आहे. घरफोडी करणा-या चोरट्यांचा अद्यापही बंदोबस्त न झाल्याने वणीकर तर दहशतीत आले आहे शिवाय पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हे देखील वाचा: 

श्रीराम व जन्नत संघात रंगला शेवटच्या चेंडूपर्यंत सामना… M ब्लास्टरचा धावांचा डोंगर

Comments are closed.