गुंजेच्या नाल्याची तहान भागवणार ‘ही’ भन्नाट आयडिया

जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानचे माजी सदस्य विजय पिदुरकर यांची संकल्पना

बहुगुणी डेस्क, वणी: गुंजेचा नाला बऱ्याच काळापासून कोरडा आहे. कधी काळी ओलाचिंब असलेला हा नाला आज स्वत:च तहानलेला आहे. हा नाला पुन्हा वाहता करता येणं शक्य आहे. म्हणूनच त्यावरील उपाययोजना माजी जि.प. सदस्य तथा जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठानचे माजी सदस्य विजय पिदुरकर यांनी सुचवल्यात. त्या संदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. या उपाययोजनांवर प्रत्यक्ष कृती केली तर चित्र पालटू शकतं, असा त्यांचा आशावाद आहे. या संदर्भात त्यांनी राजस्व विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलं.
वेकोली खाणींच्या उत्खननामुळे परिसरातील जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली आहे. वेकोली कोळसा उत्खननामुळे खोल झालेल्या खडयांंत मोठया प्रमाणात हजारो गॅलन पाणीसाठा उपलब्ध आहे. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या मागणीनुसार वेकोली वणी नार्थ भालर वसाहत कार्यालयाकडून कोलार पिंपरी खाणीचे पाणी ब्राम्हणी समोरील गुंजेच्या नाल्यात सोडून तेथील पाणी साठ्यात वाढ झालेली आहे. त्याच धर्तीवर वणी एरियाच्या निलजई खाणीत मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. केंद्रसरकारच्या जलसंर्वधन योजनेअंतर्गत खाणीतील पाण्याचा पुर्नवापर या उपक्रमात निलजई खाणीचे पाणी गुंज नाल्यात सोडल्यास पाण्याचे पुनर्भरण होऊन जलसाठ्यात वाढ व जलसंर्वधन होण्यास मदत होईल.
तसेच परिसरातील तरोडा, निलजई, पुनवट, नायगाव, कवडशी, सावंगी येथील नागरीकांना हा नाला बारमाही वापरता येईल. यातून शेती, सिंचित होऊन शेतक-यांचे उत्पादन वाढेल. हिरवा चारा व मुबलक पिण्याचे पाणी मिळाल्याने पशुधन सुदृढ राहील. त्यामुळे दूध व्यवसायाला चालना मिळेल. सोबतच उन्हाळ्यामध्ये शेती सिंचनास पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी व शेतमजुरांना रोजगार मिळेल. त्यांच्या उत्पन्नात भर पडेल. म्हणून वेकोली खाणबाधित क्षेत्रांतील जलसाठ्यांची परिस्थितीचा सुधार व पाण्याचा पुर्नवापर याबाबत-वेकोलीला सूचना करुन निलजई खाणीतील पाणी गुंज नाल्यात सोडण्याची कार्यवाही करण्याची विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे.

Comments are closed.