जितेंद्र कोठारी, वणी: माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवार 23 एप्रिल रोजी वणी ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेतला. संपूर्ण वणी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु वणी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणेमुळे रुग्णाचे हाल होत असल्याची तक्रार भाजपच्या वणी येथील पदाधिकाऱ्यांनी हंसराज अहीर यांच्याकडे केली होती.
तक्रारीची दखल घेऊन माजी गृहराज्यमंत्री यांनी ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधेबाबत माहिती घेतली. वणी ग्रामीण रुग्णालय परिसरात करोडो रुपये खर्च करून ट्रामा केअर सेंटरची भव्य इमारत बांधण्यात आली आहे. परंतु आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या इमारतीमध्ये कुठल्याही प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने हंसराज अहीर यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी अहीर यांनी यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीत कोविड रुग्णांसाठी सुसज्ज यंत्रणा तयार करावी अशी मागणी केली.
त्यानंतर हंसराज अहीर यांनी अटलबिहारी वाजपेयी सभागृह (कल्याण मंडपम) मध्ये सुरू करण्यात येणाऱ्या 100 बेडचे आयसोलेशन वार्डला भेट देऊन तेथील कामाचं निरीक्षण केलं. वणीत कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी हा आयसोलेशन वार्ड उपयोगी ठरेल, असे मत अहीर यांनी या वेळी व्यक्त केले.
या वेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सोबत वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे व भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्हा महामंत्री रवी बेलूरकर, पंचायत समिती सभापती संजय पिंपळशेंडे, नगरपरिषद उपाध्यक्ष तथा वणी शहर अध्यक्ष श्रीकांत पोटदुखे, डॉ. विकास कांबळे, डॉ पोहेकर व इतर आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
हेदेखील वाचा
हैदेखील वाचा