भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हटवांजरी येथील शेतक-याच्या आत्महत्ये प्रकरणी वादग्रस्त भूमापकासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही कार्यवाही करण्यात आली. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोप आहे. भूमापक कोमल तुमस्कर (37), राजू नामदेव एकरे (40) व वासुदेव कृष्णा एकरे (70) असे आरोपींचे नाव असून यातील दोन आरोपी हे शेतीचे हिस्सेदार आहे.
सविस्तर वृत्त असे की हटवांजरी येथील शेतकरी असलेले देवराव फरताडे यांनी 27 जुलै रोजी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृतकाच्या पत्नी मनिषा फरताडे यांनी भूमीअभिलेख विभागाच्या भोंगळ कारभारामुळे पतीने आत्महत्या केल्याचा आरोप केला होता. किशोर तिवारी यांनीही या प्रकरणी भेट घेऊन मृतकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले होते.
मृतक देवराव फरताडे यांनी यांनी वासुदेव कृष्णाजी एकरे (70) यांचेकडून सव्वा तीन एकर (1 हेक्टर 30 आर) जमीन 6/ 6/ 2019 ला 16 लाखांमध्ये विकत घेतली होती. त्यापैकी फक्त एकच एकरचा ताबा फरताडे यांच्या कडे होता. 22 एप्रिल 2020 रोजी शेतीची पहिली मोजणी केली. त्यावेळेस शेतीचे 5 भाग करून मोजणी करायची होती. पण फक्त 3 भाग मोजणी करण्यात आली. नंतर 13 ऑगस्ट 2020 ला शेतीची फेर मोजणी करण्यात आली. यात हिस्सेदारांप्रमाणे 5 भाग करण्यात येऊन तात्पुरत्या खुणा करण्यात आल्या.
परंतु आरोपी राजू नामदेव एकरे याने त्या खुणा उपडून फेकल्या. यावेळी आरोपी वासुदेव कृष्णा एकरे यांनी जोपर्यंत मृतकाच्या ताब्यात पूर्ण शेती येत नाही तोपर्यंत दरवर्षी 80 हजार रुपये देण्यात येईल असे मृतकाच्या पत्नीने सांगितले होते. ती रक्कम फेब्रुवारी महिन्यात मिळायला हवी होती. मात्र ती रक्कम अजूनपर्यंत मिळालेली नाही. या शेतीची हद्द कायमस्वरूपी करून देण्यात यावी यासाठी मृतकाने अनेकदा भूमिअभिलेख कार्यालयाचा उंबरठा सुद्धा झिजविला.
संपूर्ण शेतजमिनीचा ताबा न मिळाल्याने देवराव हे तणावात राहायचे. त्यांनी याबाबत न्याय मिळावा यासाठी भूमी अभिलेख कार्यालयात खेटे मारले होते. उपोषणाचा इशाराही दिला होता. मात्र या मुजोर विभागाने याकडे दुर्लक्ष केले. अखेर देवराव यांनी 26 जुलै रोजी तणनाषक पिऊन आत्महत्या केली. 27 जुलै रोजी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
याबाबत मृतकाच्या पत्नी मनिषा फरतडे यांनी पोटहिस्सेदार व भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचा-यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दिली होती. अखेर या प्रकरणी मंगळवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी रात्री भूमापक कोमल तुमस्कर (37), राजू नामदेव एकरे (40) व वासुदेव कृष्णा एकरे (70) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीवर भादंविच्या कलम 306, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
हे देखील वाचा: