जुन्या वादातून ट्रॅक्टर चालकावर चाकूने हल्ला

दांडगाव (मोरेश्वरी) येथील घटना, हल्लेखोरास अटक

0

भास्कर राऊत, मारेगाव: जुन्या वादातून ट्रॅक्टर चालकावर चाकू हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील दांडगाव (मोरेश्वरी) घडली. या हल्ल्यात ड्रायव्हर राजू नत्थू ढेंगळे जखमी झाला आहे. याबाबत मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला मंगेश बापुराव कांबळे याला तात्काळ अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे की फिर्यादी राजू नत्थू ढेंगळे (30) हा तालुक्यातील दांडगाव येथील रहिवाशी आहे. तो आईवडिलांसह राहतो. तो ट्रॅक्टर चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सध्या राजू गावातीलच रामदास एकरे यांच्याकडे कामाला आहे. गावातच आरोपी मंगेश बापुराव कांबळे (35) राहतो. त्याचे आणि राजूचे पटत नाही.

शनिवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान राजू ट्रॅक्टरने आपटी येथे कामासाठी गेला होता. दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ट्रॅक्टर घेऊन तो तिथून परत येण्यास निघाला. दरम्यान दांडगाव (मोरेश्वरी) येथे राजूच्या ट्रॅक्टरचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे तो मजुरांसह रस्त्याच्या कडेला थांबून होता.

दरम्यान आरोपी मंगेश राजूच्या जवळ आला व जास्त शहाणा झाला का असे म्हणत शिविगाळ करू लागला. त्यावर राजूने शिविगाळ करू नको असे उत्तर दिले. संतापलेल्या मंगेशने कमरेत लपवलेला चाकू काढला व राजूच्या हातावर वार केला. वार करताच राजूने जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला व दांडगाव येथे पोहोचला. त्याने मालक रामदास एकरे व महेश मेश्राम यांना घडलेली घटना सांगितली.

राजूने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मंगेश बापुराव कांबळे यांच्याविरोधात भादंविच्या कलम 324, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल करताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. प्रकऱणाचा तपास ठाणेदार जगदिश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात नापोकॉ. रजनिकांत पाटील करीत आहे.

हे देखील वाचा:

दारूच्या पैशासाठी पत्नीला मारहाण, केगाव येथील घटना

शेताला लावलेल्या कुंपणातील विद्युत प्रवाहाने तरुणीचा मृत्यू

पोलिसांचे नवीन सुंदर’कांड’, बडग्याच्या कोंबडबाजारासाठी ऍडव्हांस बुकिंग?

Leave A Reply

Your email address will not be published.