नागेश रायपुरे, मारेगाव: आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह आत्महत्या केलेल्या कोमल उमेश उलमाले व त्यांच्या दीड वर्षांची चिमुकली श्रुती उमेश उलमाले यांच्यावर शनिवारी दुपारी 4.30 ला येथील स्मशान भूमीत एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. यावेळी मृतकांच्या नातेवाईकांसह आप्तजन तसेच मोठ्या संख्येने शहरवासी देखील उपस्थित होते. या घटनेने संपूर्ण शहर गहिवरून गेले.
मृतक कोमल उमेश उलमाले (30) ही मारेगाव शहरात प्रभाग क्रमांक 12 येथे शासकीय विश्राम गृहाजवळ आपले पती उमेश उलमाले, 2 मुली व सासू सासरे यांच्यासह राहायची. तिच्या पतीचे आंबेडकर चौक येथे दुकान आहे. शुक्रवारी रात्री 10 ते 11 च्या दरम्यान घरी सर्व झोपलेले असताना कोमल ही आपल्या दीड वर्षाच्या मुलीला घेऊन घरून निघून गेली. दरम्यान मुलगी व आई घरात नसल्याचे पतीला लक्षात आले. पतीने तिचा रात्री शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र ती आढळून आली नाही.
अखेर आज सकाळी कोमलच्या पतीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत पत्नी व मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान मृतकाच्या घराजवळच असणा-या पुरके आश्रम शाळेनजीक असलेल्या थेरे यांच्या शेतातील विहीरीत चपला व दुधाची बॉटल आढळून आली.
नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. दरम्यान विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता यात कोमल आणि तिच्या दीड वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
आज कोरोनाचे 6 रुग्ण, अद्याप 793 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी