कुंभा दारू प्रकरण: परवानाधारक आरोपीच नाही

परवाना वाचवण्याचा घाट ? चर्चेला उधाण

0

जब्बार चीनी, वणी: कुंभा दारू तस्करी प्रकरणात रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या कारवाईत अद्याप परवानाधारकाला आरोपी केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा परवाना वाचवण्यासाठीचा प्रय़त्न तर नाही?अशी चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे.

कुंभा येथील जयस्वाल यांच्या दारू भट्टीवर 17 एप्रिलला मध्यरात्री एसडीपीओ पथकाने धाड टाकली होती. या कार्यवाहीत साडे सात लाखांची दारू जप्त करण्यात आली. तसेच यात वणीच्या नगरसेवकासह सात आरोपींना अटक करण्यात आली होती. तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

वणीतील अक्षरा बारवर 10 एप्रिल रोजी एसडीपीओ पथकाकडून अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. यात प्रवीण सरोदे सहीत चार आरोपींना अटक करण्यात आली होती. घटनेच्या दुस-या दिवशी तपासात बारचा परवाना धारक प्रवीण सरोदे नसून त्याचा भाऊ रवी सरोदे असल्याचे माहिती झाले. त्यामुळे पोलिसांनी परवानाधारकाला अटक केली.

कुंभा दारू प्रकरणात दुकानाचा परवाना हा अरुण नंदलाल जयस्वाल यांच्या नावाने आहे. मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. यात त्यांचा मुलगा राहुल जयस्वाल यांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली आहे. मात्र त्याच्या नावे परवानाच नाही.

अक्षरा बारवर कारवाई झाल्याच्या दुस-याच दिवशी तपासाअंती वणी पोलिसांनी परवाना धारकाला आरोपी केले होते. घटनेच्या दोनच दिवसात जिल्हा प्रशासनाकडून ताबडतोड कायमस्वरूपी परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात आली होती. मात्र कुंभा प्रकरणाला सहा दिवस उलटूनही ना परवाना धारकाला आरोपी करण्यात आले, ना सदर परवाना रद्द करण्यात आला.

दोघांचे कॉकटेल, प्रतिस्पर्धी ‘सुलार’

कुंभा येथील प्रकरणाबाबत सध्या वेगळेच तर्क वितर्क काढले जात आहे. हे प्रकरण परिसरातीलच एका प्रतिस्पर्ध्यानेच घडवून आणल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणात तस्करीत नेहमी मदत करणा-या एका पोलिसाचे ही नाव दबक्या आवाजात घेतले जात आहे. त्या पोलिसाने आपल्या कर्तव्याची ‘लक्ष्मण’रेखा ओलांडून तस्करीत मदत केल्याची खमंग चर्चा आहे. परिसरातील एका प्रतिस्पर्ध्याला फिटवण्यासाठी एका पोलिसाला सोबत घेतले. या दोघांचे कॉकटेल असे काही जमून आले की त्याचा ‘पंच’ मारून प्रतिस्पर्ध्याला थेट ‘सुलार’ करण्यात आले, अशी चर्चा सध्या परिसरात रंगली आहे.

यासंबंधी सर्वप्रथम मारेगावचे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौधरी व पोलीस निरीक्षक जगदिश मंडलवार यांच्याशी मोबाईलद्वारा संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर वणी पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी यासंबंधीच्या गाईडलाईन तपास अधिका-याला देण्यात आल्या असून याबाबत निश्चितच कारवाई होईल अशी प्रतिक्रिया ‘वणी बहुगुणी’ला दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.