जितेंद्र कोठारी, वणी: 27 जानेवारी रोजी दुपारी कोलारपिंपरी येथे एका महिलेचे एका चोरट्याने मंगळसूत्र पळविले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी आरोपीला चंद्रपूर येथून ताब्यात घेतले. सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे (22) असे आरोपीचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील रहिवाशी आहे.
सविस्तर वृत्त असे की संध्या ठमसक रा. वणी ही महिला 27 जानेवारीला सकाळी कोलार पिंपरी येथील खाडे यांच्या शेतात कामासाठी गेली होती. दरम्यान कोलार पिंपरी येथील टी पॉईंट जवळ एक इसम विना नंबरच्या सिल्वर कलरच्या दुचाकीवर थांबून होता. त्याने तिला दुचाकीवर बसण्यास सांगितले. मात्र नकार देताच त्याने संध्याच्या गळ्यातील मंगळसूत्र (किंमत सुमारे 12 हजार रुपये) गळ्यातून हिसकावून पळ काढला होता.
आरोपी हा महिलेच्या ओळखीचा नव्हता मात्र त्याचे नाव सचिन असल्याचे त्यांना कळले. त्यावरून संध्या यांनी आरोपी सचिन याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. आरोपीवर भादंविच्या कलम 392 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपीचा शोध सुरू होता.
दरम्यान पोलिसांना सदर आरोपीचे नाव सचिन उर्फ बादशाह संतोष नगराळे असून तो चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, गोपाल जाधव, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे, हरिंद्र भारती, पंकज उंबरकर, दीपकर वांड्रसवार यांनी केली.
हे देखील वाचा: