मारेगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या

रामेश्वर येथील तरुणाने प्राशन केले कीटकनाशक... गेल्या 5 दिवसात 5 आत्महत्या, मारेगाव तालुक्यात चाललंय काय?

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील शिवणी (धोबे) येथे सकाळी झालेल्या आत्महत्येनंतर आता दुपारी तालुक्यात रामेश्वर येथील एका अविवाहित तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. सचिन सुभाष बोढेकर अंदाजे 28 वर्षे, असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील गेल्या पाच दिवसातील ही पाचवी आत्महत्या आहे तर या दिवसातील ही दुसरी आत्महत्या आहे. सततच्या आत्महत्येमुळे तालुका हादरलाये. विशेष म्हणजे दोन वर्षांपासून मारेगाव तालुक्यात सातत्याने आत्महत्या होत असताना प्रशासन, लोकप्रतिनिधी, मंत्री हे कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसत नाही.

प्राप्त माहितीनुसार, सचिन सुभाष बोढेकर हा आपल्या आईवडिलांसोबत रामेश्वर येथे राहायचा. सचिनचे वडील हे अल्पभूधारक असून यांना अंदाजे दोन एकर शेती असल्याची माहिती आहे. सचिन आपल्या वडिलांसोबत राहून शेतीमध्ये मदत करायचा. परंतु यावर्षी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पुरते कंबरडे मोडलेले आहे. साधा लागवडीचा खर्च सुद्धा निघायची वेळ नसल्याने शेतकरी हवालदिल झाला.

आज दि. 30 ऑगस्टला दुपारच्या वेळेस सचिनचे आईवडील शेतामध्ये गेले होते. दरम्यान तो घरी एकटाच होता. घरी कुणी नसल्याची संधी साधून सचिनने विषारी कीटकनाशक प्राशन केले. काही वेळाने याची माहिती गावकरी आणि घरच्यांना मिळताच त्याला तात्काळ मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तो अविवाहित होता. त्याच्यामागे आईवडील आणि एक बहीण असा आप्तपरिवार आहे. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

सततच्या आत्महत्या कधी थांबणार?
मारेगाव तालुक्याची ओळख आता आत्महत्येचा तालुका अशी होत आहे. दर आठवड्यात 4-5 आत्महत्येच्या घटना तालुक्यात घडत आहे. ऐन सणावारांमध्ये देखील आत्महत्येच्या घटना घडताना दिसत आहे. मात्र अद्यापही प्रशासकीय स्तरावर या तालुक्यासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना यांनी आता यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

हे देखील वाचा: 

मारेगाव तालुक्यात आज पुन्हा आत्महत्या, 5 दिवसात 4 आत्महत्या

रेसर बाईकची पॅशन गाडीला भीषण धडक, एक जागीच ठार

पीएम सन्मान निधी: केवायसी पूर्ण करा; अन्यथा लाभ विसरा…

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.