भास्कर राऊत, मारेगाव: चोपण येथे सध्या भागवत सप्ताह सुरु आहे. त्यानिमित्ताने गावातील रस्ते स्वच्छ दिसत आहेत. अनेक घरांसमोर रांगोळ्या काढलेल्या आहेत. गावात दिवसभर संगीतमय वातावरण दिसून येत असून वर्षभर वाहणाऱ्या गटारगंगा काही काळासाठी का होईना बंद झालेल्या आहे. त्यामुळे गावात वर्षभर भागवत सप्ताह ठेवावा अशी इच्छा अनेक चोपणवासियांनी व्यक्त केलेली आहे.
मागील अनेक वर्षांपासून चोपण हे गाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होते. आखाडा, मंदिर, श्रीमंती तसेच नोकरीचे असलेले मोठे प्रमाण. येथे असलेले पावन गंगाराम महाराज यांचे पवित्र मंदिर. आधी एक गाणेही प्रसिद्ध होतं. “चोपण गाव दूरवर नाव, ठिकाण देवाचं! नाव गंगाराम बुवाचे” अशा चोपणची कहाणी खूप दुरवर होती. परंतु काही वर्षांपासून या चोपणला ग्रहण लागल्यासारखे झाले.
मार्डी ते चनोडा या गावाला जाणाऱ्या या रस्त्यावर गावाच्या सुरुवातीपासून पाण्याची गटारगंगा वर्षभर वाहत असते. या रस्त्यावर अनेक वाहनचालक आपली वाहने घेऊन पडल्याचीही उदाहरणे आहेत. यात अनेकांना जखमाही झालेल्या आहेत. पण पाणी मात्र कमी झालेले नाही. सध्या भागवत सप्ताह सुरु आहे. सप्ताह सुरु झाला तेव्हापासून गावातील घळघळ वाहणारे पाणी अदृश्य झालेले आहे.
गावातील काही ठिकाणी पाणी वाहत असले तरी मुख्य रस्त्यावरील वाहते पाणी बंद झाल्याने चोपणवासियांसोबतच या रस्त्याने येणे जाणे करणारेही आश्चर्यचकित झालेले आहे. त्यामुळे तेही चोपण या गावात वर्षभर भागवत सप्ताह राहावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने अनेकांना पाणी बंद करण्याविषयी नोटीसी जारी केल्या तरीही त्याचा परिणाम या लोकांवर झाला नव्हता.
पाणी अदृश्य झालेच कसे
वर्षभर वाहणारे रस्त्यावरील पाणी हे भागवत सप्ताहापुरतेच अदृश्य होते. सप्ताह संपला की पुन्हा जैसे थे. मग सप्ताहमध्येच वाहणारे पाणी कुठे जाते याचा शोध काही नागरिकांना अजूनही लागलेला नाही. कारण वर्षभर जी घरगुती कामे असतात तीच कामे सप्ताह काळातही असतात. मग त्यावेळी हे पाणी कोठे मुरते असा खोचक प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.