आपली मातृभाषा आपला सन्मान आहे – स्नेहलता चुंबळे

'माझं गाव माझा वक्ता' या अभिनव व्याख्यानमालेत प्रतिपादन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आपल्या मातृभाषेचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे. आपली मातृभाषा आपला सन्मान आहे. सर्वांनी आपल्या मातृभाषेचा गौरव केला पाहिजे. अत्यंत संपन्न आणि समृद्ध असणाऱ्या आपल्या मराठी भाषेबद्दल आपल्याच मनात अभिमान नाही. प्रदीर्घ प्रयत्नांनंतरदेखील ती अभिजात भाषा म्हणून घोषित झाली नाही. त्यामुळे इंग्रजीसह इतर अनेक भाषांतून येणाऱ्या शब्दांना आपण सरसकट स्वीकारत आहोत. त्यामुळे आपल्याच भाषेतील शब्दांची गळचेपी झालेली आहे. आपल्याच मनामध्ये मराठीमध्ये बोलताना न्यूनगंड येतो. या सगळ्यांमुळे आजच्या मराठी मनालाच मराठी भाषेचे वावडे पहावयास मिळते. ही अत्यंत चिंताजनक आणि चिंतनीय गोष्ट आहे.” असे विचार सेवानिवृत्त शिक्षिका स्नेहलता कमलाकर चुंबळे यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघ शाखा वणी आणि नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रति महिन्यात होत असलेल्या ‘माझं गाव माझा वक्ता’ या अभिनव शृंखलेतील तिसावे पुष्प गुंफताना त्या व्यक्त होत होत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड उपस्थित होते. प्रास्ताविकात विदर्भ साहित्य संघाचे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी विद्यालयात विज्ञान विषय शिकवणाऱ्या आणि इंग्रजी विषयात अभ्यास केलेल्या व्यक्तीच्याद्वारे मराठी व्यवहाराबद्दल व्यक्त होत असणारी ही चिंता महत्त्वपूर्ण आहे असे सांगतिले. चुंबळे यांचे विषय निवडीबाबत अभिनंदन केले. आपल्या मुद्देसूद आणि प्रभावी भाषणात चुंबळे यांनी विविध महापुरुषांनी मराठी भाषेविषयी काढलेल्या गौरवोद्गागारांचा आढावा घेतला. सामान्य व्यवहारात आपण किती परकीय शब्द किंवा संकल्पना वापरत आहोत, हे विविध उदाहरणांच्या द्वारे अधोरेखित केले. आपल्याला मराठी बोलणे आणि वाचणे कमीपणाचे वाटते. तर तो आपल्या व्यक्तिमत्त्वातला दोष आपणच दूर करायलाच पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद पुंड यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, भाषा ही केवळ शब्दांचा खेळ नाही. त्यातून मांडलेले विचार आणि होत असणारे संस्कार या व्यापक पातळीवर भाषेचा विचार व्हायला हवा. परकीय भाषेला विरोध नाही; पण त्यासोबत येणारे परकीय विचार दूर करण्याची क्षमता विकसित व्हायला हवी. मराठीची समृद्ध अशी परंपरा आणि संस्कार आपण जोपासायला हवी. ती वृद्धिंगत करायला हवी. असे विचार डॉ. पुंड यांनी मांडलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदर्भ साहित्य संघाचे वणी शाखेचे सचिव डॉ. अभिजित अणे यांनी तर आभारप्रदर्शन गजानन भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे, राम मेंगावार यांनी विशेष परिश्रम घेतले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.