घरून कॉलेजसाठी निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता

अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी : लहान भावाला कॉलेजला जाते म्हणून घरुन निघालेली अल्पवयीन विद्यार्थिनी परत घरी आलीच नाही. 2 दिवस नातेवाईक आणि मैत्रिणीकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. शेवटी बेपत्ता मुलीच्या वडिलांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची 17 वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.

वणी तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेली मुलगी येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यासाठी ती आपल्या लहान भावासोबत भोंगेळे ले आऊट येथे भाडयाने रूम करून राहत आहे. शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ती आपल्या लहान भावाला कॉलेजला जाते असे सांगून घरुन निघाली. शनिवार 14 ऑक्टो. रोजी दुपारी 12.30 वाजता मुलीच्या भावाने वडिलांना फोन करून सांगितले की ताई कालपासून घरी आली नाही. 

घाबरलेल्या अवस्थेत वणी पोहचून वडिलांनी आजूबाजूला तसेच नातेवाईक व तिच्या मैत्रिणीला विचारपूस केली. मात्र मुलीचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठून त्यांची अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार नोंदविली. पोलिसांनी कलम 363 भादवि अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

Comments are closed.