आमदार बोदकुरवार यांची मारेगाव येथे आढावा बैठक
कोरोना संदर्भात अधिका-यांशी करण्यात आली चर्चा
नागेश रायपुरे, मारेगाव: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील पंचायत समितीच्या सभागृहात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे अध्यक्षते खाली तालुका कृषी व आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही मुजोर अधिकाऱ्याची आमदार बोदकुरवार यांनी चांगलीच कान उघडणी केल्याची चर्चा आहे.
आमदार बोदकुरवार यांनी प्रथम कृषी विभागाचा आढावा घेतला. परंतु 2020/21 हंगामातील शेतकऱ्यांना नियोजन पुर्ण आढावा देता आला नाही. यावर आमदार बोदकुरवार यानी अधिका-यांची चांगलीच कानउघाडणी करून सध्या परिस्थिती चांगली नसल्याने शेतक-यांना खते, बियाणे, योजना मिळण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करा नाही तर शेतक-यांना त्रास झाला व त्यांनी आंदोलन केले तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील अश्या सूचना दिल्या.
आरोग्य विभागाचा आढावा घेतला असता आरोग्य अधिकारी गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे गैरहजर आहेत. परंतु ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रभार दिला. त्यांच्याकडे आर्थिक व्यवहार मात्र दिले नाही. त्यामुळे कोरोणा रूग्णाचे बेहाल आहेत. तपासणी करिता आलेल्या रूग्णांना बरिच प्रतिक्षा करावी लागते. तसेच आमदार फंडातून आक्सिजनचे 20 पॉइंट दिले परंतू केवळ तीनच पाईंट सुरू आहेत.
त्यामुळे कोरोणा रूग्णांच्या चाचण्या घेण्यासाठी व त्यांचा त्रास कमी करण्यासाठी नैतिक जबाबदारी स्वीकारून काम करा तुम्हाला काय अडचणी येत असतील तर मला सांगा मी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. मारेगाव येथे कोरोणा रूग्णांसाठी 70 बेड ची व्यवस्था करण्यात आली असून गरज पडल्यास आणखी व्यवस्था करण्यात येईल पण रुग्णांना प्राथमिक उपचार ईथेच करा अशाही सूचना आमदारांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जि.प. सदस्य अरूणा खंडाळकर, अनिल देरकर, उपसभापती संजय आवारी प.स.सदस्य सुनिता लालसरे, तहसिलदार दिपक पुंडे, तालुका कृषी अधिकारी एस.के.निकाळजे, तालुका आरोग्य अधिकारी गेडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ.वानखेडे, गटविकास अधिकारी नाल्हे उपस्थित होते.
हे देखील वाचा: