ब्युरो, मारेगावः आजच्या युगात माणुसकी जपणारे आणि सामाजिक भान असलेले फार कमी लोक आहेत. त्यातच आजच्या महागाईच्या जमान्यात आपल्या पदराची मिळकत दुसऱ्याना देण्यासाठी फार मोठं मन लागतं. परंतु अशा मोठ्या मनाची मानसेसुध्दा आज या जगात, समाजात असल्याचा प्रत्यय एका विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या लोकांनी अनुभवला. मारेगाव तालुक्यातील बोटोनी चिंचोणी गावात एक विवाह सोहळ्यात सामाजिक भान असलेला युवक आपल्या स्वताच्या विवाह प्रसंगी आदिवासी दुर्गम भागात काम करित असलेल्या निड या सामाजिक संस्थेला विवाहखर्चात काटकसर करुन २५ हजारांची आर्थिक मदत केली. संस्थेचे सुनील गोवारदिपे यांना सदर रकमेचा धनादेश या नवदाम्पत्याने सुपूर्त केला.राहुल कुत्तरमारे व वधु मीनाक्षी असे यांचे नाव असून त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
राहुल व मीनाक्षीच्या सामाजिक दातृत्वाची चर्चा पंचक्रोशीत उमटली आहे. आज लग्न सोहळा म्हटले की बँड, घोडा, वरपक्षाचा मोठा लवाजमा, तोही घेतलेल्या हुंड्याच्या भरवश्यावर.परंतु राहुल अन् मीनाक्षी या नवदांपत्याने समाजभान जोपासत होणाया विवाहखर्चात कात्री लावून, आदिवासीबहुल भगिनीसाठी रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना चांगले शिक्षणाचे धड़े घेता यावे या उद्देशान विवाह प्रसंगी खास करुन आदिवासी क्षेत्रात काम करीत असलेली निड या सामाजिक संस्थेला २५ हजारांची रक्कम देऊन समाजऋण फेडण्याचा प्रयत्न केला. निड सामाजिक संस्थेचे सुनील गोवारदिपे यांनी या प्रसंगी वधुवरास शुभाशीर्वाद दिले शासनामार्फत आदिवासी दुर्गम भागातील मुलामुलींच्या अनेक समस्या असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव निड संस्थेला आहे. निड संस्थेच्या माध्यमातून नुकतीच शिक्षणापासून दूर असलेल्या आदिवादी मुलींना मुंबईची सहल करविली. त्या माध्यमातून या वंचित घटकाला रोजगार कसा मिळेल यासाठी निड सामाजिक संस्था प्रयत्नात असून त्या आदिवासी मुलींसाठी एक रोजगार केन्द्र म्हणून शिवणकला केन्द्र उघडण्याचा मानस आहे.
शिक्षणबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहे. येत्या काही दिवसांत ग्रामीण भागात आदिवासी मुलींसाठी रोजगार उपलब्ध करण्याचा मानस निडचे सुनील गोवारदिपे यांचा आहे. कारण या भागातील मुलींना आत्मनिर्भर करणे, त्यांना कामाच्या ठिकाणी संरक्षणाची मिळणे यासाठी निड सामाजिक संस्था त्या दिशेने विचार करित आहे. या निमित्ताने राहुल आणि मीनाक्षीने दिलेल्या मदतीतून निड संस्थेला बळ मिळाले आहे. त्या समाजऋणाने अनेक मुलींना रोजगार मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.