कोळसा तस्करांवर कारवाई, चार ट्रक जप्त
वणी/विवेक तोटेवार: वणी तालुक्यात अनेक दिवसांपासून अवैध कोळसा तस्करी सुरू आहे. मीडियाने देखील हा मुद्दा वारंवार उचलला होता. मात्र त्यावर कार्यवाही शून्य दिसून येत होती. शिवाय झाली तरी ती थातुरमातुर कार्यवाही असायची. मात्र काल रात्री उशिरा 1 ते 2.30 वाजताच्या दरम्यान स्थानीय गुन्हा शाखा यवतमाळ यांनी मोठी कार्यवाही केली. यात कोळशाने भरलेले चार ट्रक पकडण्यात आले आहे.
सोमवारी रात्री 1 ते 2.30 वाजताच्या दरम्यान पोलिसांना चार वाहने लालपुलिया चिखलगाव परिसरात कोळसा भरून उभे दिसले. सदर चारही वाहने ही संतोष उर्फ अण्णा उंटलावार यांच्या कोळशाच्या प्लाटजवळ उभी होते. ही वाहने उभे असल्याने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक पतंगे यांना संशय आला. त्यांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्या चारही वाहनात जवळपास 10 टन इतका कोळसा व चुरी आढळून आली. कोळशाच्या परवान्याबाबत गाडी चालकांना विचारणा केली असता वाहनाच्या चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
यावरून पालिसांनी चालक जियाबीन इंदिस चावस (30) मोमीनपुरा, याचेकडून टाटा पीक उप वाहन क्रमांक एम एच 49 डी 306, राजेश रमेश गुंटीवार (32) मोमीनपुरा याचेकडून महिंद्रा फोर्स कंपनीचे वाहन (क्रमांक एम एच 29 टी 4770), विशाल दिनेश भालदन (28) रा. संकटमोचन मंदिर यवतमाळ याचेकडून पिकअप वाहन (क्रमांक एम एच 29 एम 1569), तर दिलीप भावराव कुचनकर (42) रा. पंचशील नगर याचेकडून पिकअप वाहन (क्रमांक एम एच 33 जि 1496) जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या कोळशाची किंमत 67 हजार असून वाहनांची किंमत दहा लाख आहे. असा एकूण 10 लाख 67 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर चारही आरोपीवर कलम 41(1) (5) सीआरपीसी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. चारही वाहन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुरलीधर गाडामोडे करीत आहे.
ही गोपनीय माहिती वणी पोलिसांना का मिळाली नाही ?
यवतमाळ येथील स्थानीय गुन्हे शाखेला वणीत येऊन अवैध कोळसा तस्करांवर कार्यवाही करावी लागत आहे. तेव्हा वणी पोलीस कार्यवाही का करीत नाही ? वेकोली प्रशासनाने यवतमाळ येथे तक्रार तर केली नव्हती ना ? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या घटनेबाबत वणीकर जनतेकडून वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहे. वरील चारही आरोपींना फक्त संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे हे महत्वाचे .