भालरच्या जंगलात कोंबड बाजारावर पोलिसांची धाड

4 जणांना अटक, पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

विवेक पिदूरकर, शिरपूर: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भालर जंगल परिसरात आज दुपारी पोलिसांनी कोंबड बाजारावर धाड टाकली. यात 4 जणांना अटक करण्यात आली असून कारवाईत 5 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Podar School 2025

पोळाची कर (बडगा) निमित्त परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. अनेक ठिकाणी कोंबड बाजारही भरवला जातो. ही बाब लक्षात घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनने 4 पथक तयार केले होते. दरम्यान पथकाला पेट्रोलिंग दरम्यान भालर जवळील जंगल परिसरात कोंबड बाजार सुरू असल्याची माहिती मिळाली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांची वेशांतर करून धाड
माहिती मिळताच पोलिसांनी वेशांतर केले व घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी त्यांना काही लोक कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावताना आढळून आले. पोलिसांनी लगेच छापा टाकून काहींना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी धाड टाकताच तिथे एकच पळापळ झाली. लोकांनी मिळेल त्या मार्गाने पळ काढायला सुरूवात केली. मात्र या कारवाईत 4 लोक पोलिसांच्या हाती आले. तर अनेक लोक चिखल व जंगलाचा फायदा घेत पळून गेले.

या कारवाईत आशिष अण्णाजी उकीनकर (29) रा. पुनवट, खुशाल मारोती धोटे (49) रा. पुनवट, बंडू ढोरे (33) रा. पुनवट, धनराज दादाजी सातपुते (33) रा. तरोडा हे पोलिसांना गवसले. त्यांच्याकडून 24,100 रुपयांची रोख रक्कम तसेच घटनास्थळावरून जखमी अवस्थेतील कोंबडे, 3 मोबाईल, लोखंडी कात्या, 6 मोटार सायकल असा एकूण 5 लाख 5 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींवर मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल कऱण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराव धरणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सचिन लुले, राम कांडुरे, प्रमादे जुनूनकर, सुगत दिवेकर, अनिल सुरपाम, विनोद मोतेराव, राजन इसनकर, अभिजीत कोशटवार यांनी केली. जुगार, कोंबड बाजार याच्यावर शासनाने बंदी आणली असून परिसरातील नागरिकांनी आपल्या जवळील कष्टाचे पैसे जुगारात लावू नये असे आवाहन ठाणेदार सचिन लुले यांनी नागरिकांना केले आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.