वणीतील बँक कॉलनीतील रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत
रहिवाशांना नाहक त्रास, तात्काळ काम सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा
विवेक तोटेवार, वणी: गेल्या 8 महिन्यांपासून शहरातील बँक कॉलनीतील मुख्य रस्त्याचे काम काही न काही कारणावरून बंद आहे. याचा नाहकच त्रास कॉलनी व परिसरातील लोकांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदने देण्यात आली. परंतु काम सुरू झाले नाही. शेवटी कॉलनीतील जनतेने आमदारांना सोमवार 14 जून रोजी निवेदन देत काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शहरात नांदेपेरा रोडपासून जवळच सहकारी बँक कॉलनी आहे. येथे मुख्य रस्त्यावर 20 कुटुंब राहतात. तर या रस्त्याचा उपयोग जवळपास 500 कुटुंब ये-जा करण्याकरिता करतात. या रस्त्याच्या बाजूला 20 ऑक्टोबर 2020 रोजी भूमिगत नाल्याचे काम सुरू झाले. यात भूमिगत नाल्या व रस्त्याचे सौंदयीकरण याचा समावेश होता. मात्र एका महिन्याच्या आत 8 नोव्हेंबरमध्ये काम बंद करण्यात आले. हे काम काही कारणास्तव ठेकेदार अंकित बोहरा [sub contractor] यांनी 2 महिने बंद केले.
त्यानंतर 10 जानेवारीला कामास सुरवात झाली. मात्र महिन्याभरानंतर पुन्हा 15 फेब्रुवारीला काम बंद करण्यात आले. या ठिकाणी करण्यात आलेले भूमिगत नाल्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. तसेच पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर चिखल साचले आहे. कॉलनीतील लोकांना पायदळ फिरणे कठीण होऊन बसले आहे.
रस्त्यावरील खड्यामध्ये पावसाने पाणी साचल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे व भूमिगत नाल्यांचे काम निवेदनानंतर 10 दिवसात सुरू न केल्यास वणी नांदेपेरा रास्ता बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागावर मोर्चा नेणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत आता आमदार व सा. बां. विभाग काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा: