आठ शतकांपासूनच संत नामदेव महाराज ‘ग्लोबल’च आहेत

आज संत नामदेव महाराज यांची 750वी जयंती

1

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संत नामदेव महाराजांचा जन्म इसवी सन 1270ला झाला. यंदाच्या कार्तिकी एकादशीला म्हणजेच 26 नोव्हेंबरला त्यांचं 750वी जयंती साजरी होत आहे. वारकरी धर्माच्या उभारणीत, विस्तारात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

संत नामदेव महाराजांच्या अनेक पैलूंची विशेष चर्चा होत नाही. कुशल संघटक, प्रतिभावंत कवी, कीर्तनकार, गायक, संवादक असे कितीतरी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यावर उहापोह करण्याचा हा छोटासा प्रयत्न.

रामेश्वर ते मुलतानपर्यंत संत नामदेव महाराजांनी जनसंपर्क केला. 750-800 वर्षांपूर्वीचा काळ बघता त्यांचं ते कार्य ग्लोबलच होता. आज इंटरनेट, सोशल मीडिया आणि अन्य माध्यमं आहेत. यांमुळे आपण जगाशी कनेक्ट झालोत. ग्लोबल झालोत. 700-750 वर्षांपूर्वी ते शक्यच नव्हतं. तरीदेखील हळूहळू का होईना शतकानुशतके संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार होतच आहे. ते ग्लोबल होत आहेत.

जगभरातील अनेक घरांत आरती झाल्यावर ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ आजही म्हटलं जातं. जिथे जिथे हे आहे, तिथे तिथे संत नामदेव महाराज आहेतच. अर्थात हे पद संत नामदेव महाराजांचंच. त्यामुळे ते आजही ग्लोबल आहेत, असं म्हणायला काहीच हरकत नाही. अनेक दंतकथांसह संत नामदेव महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मासोबतच अनेक दंतकथाही जन्माला आल्यात.

त्यांचा ‘शिंपी’ हा व्यवसाय. शिंपल्याला ‘शिंपी’ किंवा ‘शिपी’ असंही बोलताना म्हटलं जातं. त्यामुळे शिंपल्यातून त्यांचा जन्म झाला, हीदेखील एक दंतकथा पुढे आली. त्यांचा जन्म कसा नॉर्मल झाला, हे त्यांनीच लिहून ठेवलं. संत नामदेव म्हणतात, ‘प्रसवली माता मज मळमुत्री’. नामदेव महाराजांनी अनेक ठिकाणी सर्वसामान्यांच्या जगण्यातले नित्य अनुभव मांडलेत. आपल्या काव्यप्रतिभेने जग जवळ केलं.

संत नामदेव महाराजांनी या मराठी मातीवर अनेक उपकार केलेत. त्यांनी ‘कविता’ सोपी केली. तत्कालीन किंवा त्याही पूर्वीच्या कवितेवर संस्कृतचा प्रभाव होता. कवितांचे छंद, वृत्त वगैरे संस्कृताधारित होते. त्यामुळे सर्वसामान्यांना कविता लिहिणे ही अवघडच बाब होती.

नामदेवांनी नवा छंद दिला. तो छंद म्हणजे ‘अभंग’ तो आजही ‘अभंग’च आहे. अनब्रेकेबल आहे. यात लघू, गुरू ही भानगड नाही. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या ओळीत सहा अक्षरं आणि चवथ्या ओळीत चार अक्षरं. एवढं जरी सांभाळता आलं, तरी अभंग लिहिता येतो.

अभंग या सोप्या छंदामुळे अनेक तत्कालीन प्रतिभावंत लिहायला लागलेत. चोखोबा, गोरोबा, सोयराबाई, निर्मळा, बंका यांनी अनुभवांची समृद्धी अभंगांतून मांडली. अभंगातून ते ‘बोलके’ झालेत. हाच छंद जगद्गुरू तुकोबारायांपासून अनेक संतांनी वापरला.

महात्मा ज्योतिबा फुले यांनीदेखील याच छंदातून ‘अखंड’ लिहिलेत. संत नामदेवांच्या कवितेत कमालीची ताकद आहे. त्यांच्या वाणीचं, त्यांच्या काव्याचं गुणगान संत ज्ञानेश्वर गातात. नामदेवांसारखा भक्त या आधी ना कधी झाला, ना कधी होणारं असंही ज्ञानदेव म्हणतात.
ज्ञानदेव माउली म्हणतात,

‘परि नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व ॥
हा रस अद्भुत निरूपम॥

संत नामदेव महाराजांचं आणखी एक मोठं कार्य आहे. त्यांनी गाभाऱ्याच्या चौकटीतलं बंदिस्त कीर्तन चंद्रभागेच्या वाळवंटात सर्वांसाठी आणलं. चंद्रभागेसारखंच ते वाहत कुठच्या कुठे गेलं. संस्कृतप्रचुर कीर्तनाऐवजी मराठमोळं कीर्तन जगाला दिलं. तेव्हा देवळाच्या गाभाऱ्यात बसून कीर्तन ऐकणं, सर्वांनाच शक्य नव्हतं. जात, धर्म, वर्ण त्याच्या आड यायचे.

नामदेवांचं कीर्तन हे नामदेवांच्याच व्यक्तिमत्त्वासारखं खुलं होतं. या कीर्तनाचं संचालन संत जनाबाई महाराज करायच्या. मांदियाळीतल्या किंवा उपस्थितातल्या एका संताचा अभंग घ्यायचा. त्यावरच व्हायचं कीर्तन. जनाबाई, परसा भागवत यांपासून संत ज्ञानेश्वरांपर्यंत अनेकांनी त्यांच्या कीर्तनशैलीचं वर्णन केलंय. भरभरून कौतुकही केलं.

संत नामदेव महाराजांच्या आधी हेमाद्री पंडित होऊन गेलेत. त्यांनी चतुवर्ग चिंतामणी’ ग्रंथ लिहिला. वर्षाला करावयाची हजारों व्रतं सांगितलीत. सामान्य माणून यात गुंतला. कोणता देव, कोणतं तीर्थ, कोणती पूजा, कोणतं व्रत हे त्याच्या आवाक्याबाहेर जात होतं.

अशा सामान्यजनांचं कन्फ्युजन संत नामदेव महाराजांनी दूर केलं. त्यांनी देव सोपा केला. पूजा सोपी केली. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल’ म्हणत त्यांनी सर्वांना विठ्ठल दिला. कर्मकांडांतून अनेकांना बाहेर काढलं.

रामेश्वरम ते मुलतानच्या प्रवासात त्यांनी माणसांचा अभ्यास केला. जगण्याच्या विविध पैलूंचा अभ्यास केला. पंजाबात तर त्यांची कारकीर्द गाजली. आचार्य विनोबा भावे म्हणतात, की जो पंजाब अलेक्झांडर जिंकू शकला नाही, तो पंजाब संत नामदेवांनी प्रेमाने जिंकला.

आजही जगभरात विखुरलेल्या शिख धर्मियांच्या श्रद्धास्थानी संत नामदेव महाराज आहेत. जिथे जिथे पवित्र ग्रंथ गुरूग्रंथसाहिब आहे, तिथे तिथे संत नामदेव महाराज आहेतच. डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत आपण संत नामदेवांचे ऋणी आहोत.

त्यांनी आपल्या गाथेत समकालीन अनेक संतांवर लिहिलं. लाईव्ह टेलिकास्टसारखं अनेकांच्या समाधीसोहळ्याचं वर्णनही केलं. अत्यंत सहज, सोपं आणि रसाळ लिहिलं. त्यांनी अनेक संतांचा वारंवार गौरव केला. मास कम्युनिकेशनसाठी त्यांनी कीर्तन ही कला वापरली. कीर्तन हाच संवाद केला. त्यातही ठाय धुमाळी हा सहज अपील होणारा पंजाबी ठेका वापरला.

संत नामदेवांनी लोकभाषेला प्राधान्य दिलं. लोकभाषेचा सन्मान केला. ते ज्या भागात गेलेत, ते तिथलीच लोकभाषा वापरत. मराठी, गुजराती, पंजाबी, अवधी, खडी, व्रज या सहा भाषांमधून तर त्यांनी रचनादेखील केल्यात. आज महाराष्ट्रासह राजस्थान, गुजराथसह अनेक राज्यांत त्यांची मंदिरं आहेत. गुरुद्वारा आहेत. लंडनचं खालसा कॉलेजसह जगभरातील अनेक विद्यापीठांमधून संत नामदेव अभ्यासले जातात.

‘संतकृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया…. तुका झालासे कळस’ हा संत बहिणाबाई यांचा अभंग. यातील ‘तेणे केला हा विस्तार’ ही ओळ त्यांनी संत नामदेवांना समर्पित केली. संत नामदेव महाराज हे अत्यंत प्रॅक्टिकल होते. त्यांनी आपल्या भारतभरातील पर्यटनात विविध कार्य केलीत. त्यांनी प्रामुख्याने प्रबोधन केलेच.

त्यासोबत संत नामदेव महाराजांनी विहिरी, तलाव खोदण्याची लोकांना प्रेरणा दिली. पर्यावरणरक्षणाचंही कार्य केलं. लोकांना जाचक कर्मकांडांतून बाहेर काढलं. त्यांना प्रपंच आणि परमार्थ व्यवस्थित सांभाळण्याच टेक्निक दिलं. दूरदृष्टी ठेवूनच त्यांनी कार्य केलं. विपुल लेखन केलं. संत नामदेव महाराज विशेषांक www.Ringan.in ने काढला. त्यांचं एकेक कार्य आज ग्लोबल झालं. त्यांचा एकेक विचार ग्लोबल झाला. त्यांची वाणी ग्लोबल झाली. त्यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

हेदेखील वाचा

अल्पवयीन मुलीला पळवून नेणा-या मजनुला ठोकल्या बेड्या

हेदेखील वाचा

‘युरेका युरेका’, ‘सोपान सोपान’ म्हणत सुटावं……

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.