संताजी महाराजांनी केला ‘हा’ मोठा चमत्कार
आज संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती
सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘‘होते संतोबा, म्हणून वाचले तुकोबा’’ असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. संताजी जगनाडे महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आज जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग आपल्यापर्यंत पोहचलेत. इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा, जनसागरातून बाहेर काढण्याचा चमत्कार हा संताजी जगनाडे महाराजांनी केला.
त्यांनी हे अभंग पुन्हा मिळवून लिहून काढलेेत. जगद्गुरू तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज यांच्या काळाविषयी बरेच मतप्रवाह आहेत. काहींच्या मते ते समकालीन होते. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक होते, तर काहींच्या मते ते तुकोबारायांच्या निर्वाणाच्या काही वर्षं आधी जन्मलेत.
त्यांच्या कार्यकाळ कोणताही असो, या दोघांची कर्मगाथा, जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. त्यामुळेच तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराजांना वेगळे करता येणार नाही. संताजी महाराजांची तुकोबारायांच्या विचारांशी असलेलं तादात्म्य हे ‘‘तुका-संता नाही दुजा’’ म्हणावं इतक एकरूपं आहे.
भूगोलानेही जवळचेच
संताजी महाराजांचा जन्म मावळ प्रांतात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चाकण येथे झाला. संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू या गावात झाला. संताजी महाराजांचं आजोळ हे जवळचंच सुदुंबरे हे गाव. ही सगळी गावं 20-30 किलोमिटरच्या घेऱ्यातच आहेत. देहू, सुदुंबरे, चाकण ही गावे आसपासच आहेत.
त्यामुळे येथील लोकांमध्ये त्याकाळी कम्युनिकेशन होतंच. या गावांमध्ये विवाहसंबंधही होत. एकमेकांचा पुरेसा परिचयदेखील असणं स्वाभाविकच आहे. जगद्गुरू तुकोबारायांच्या कार्याची मोठी व्याप्ती होती. प्रत्यक्ष भेटून किंवा ऐकून तरी सर्वांना तुकाराम महाराज माहीत असतीलच. संत तुकाराम महाराज आणि संत संताजी महाराज हे समकालीन होते याबद्दल विविध मतप्रवाह आहेत. मात्र भूगोलाने ते जवळ होेते हे मात्र नक्की.
संताजी महाराजांचा जन्म 8 डिसेंबर 1624 ला झाला असं मानलं जातं. 9 फेब्रवारी 2009 रोजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या काळात त्यांच्यावरील एक पोस्टाचं तिकीटही निघालं. यात त्यांचा कार्यकाळ 1624 ते 1688 असा सांगितला आहे. शासकीय मतानुसार संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन ठरतात. काही मतप्रवाहानुसार त्यांचा कार्यकाळ 1650 ते 1608 असाही सांगितला जातो.
मात्र वारकरी संताजी महाराजांना संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक मानतात. डॉ. किशोर सानप यांच्या “समग्र तुकाराम दर्शन” या ग्रंथात संत चरित्रकार महिपतीबोवांनी संत तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांचा उल्लेख केला आहे.
भावे यांनी 1. निळोबाराय, 2. रामेश्वर भट 3. गंगाराम मवाळ, 4. संताजी जगनाडे, 5. महादजीपंत कुळकर्णी, 6. शिवबा कासार, 7. अंबाजीपंत, 8. कोंडोपंत लोहकरे, 9. मल्हारपंत कुळकर्णी, 10. मालजी गाढे, 11. गवरशेठ वाणी, 12. नावाजी माळी आणि 14. कोंडपाटील ही नावे दिली आहेत. सकल संतगाथेच्या दुसऱ्या खंडात एक वेगळा उल्लेख आहे. त्यात म्हटलं आहे की, वा. सी. बेंद्रे यांनी संताजी महाराजांचा काळ 1650च्या पुढील मानला आहे.
संताजी महाराजांचे आजोबा भिवाशेठ जगनाडे यांचा तेलाचा घाणा होता. तेलाचा हा व्यवसाय त्यांचा मुलगा विठोबाशेठ यांच्याकडे आला. विठोबाशेठ यांचं लग्न सुदुंबरे येथील काळे परिवारातील मथुबाईंसोबत झालं. काही ठिकाणी त्यांच्या नावाचा मथाबाई असाही उल्लेख येतो. विठोबा आणि मथाबाईंच्या पोटी संताजी महाराजांचा जन्म झाला. संताजींना अक्षरओळख, गणित असं बऱ्यापैकी शिक्षण मिळालं. संताजी अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचे होते. त्यांची निरीक्षणं अत्यंत सूक्ष्म असायची.
वयाच्या दहाव्या वर्षीच वडलोपार्जित तेलाच्या व्यवसायात संताजींचा प्रवेश झाला. त्याकाळी चाकण ही एक उत्तम बाजारपेठ होती. जगनाडे परिवाराचा तेलाचा व्यवसाय जोमात होता. ते त्या काळातील यशस्वी इंडस्ट्रियालिस्ट होते. आर्थिक संपन्नता होती. गावात मानाचं स्थान होतं. जगनाडे परिवाराची कीर्ती सर्वत्र होती. वयाच्या 11व्या वर्षी संताजींच्या विवाहासाठी स्थळ सांगून आलं. त्याकाळात लग्न बालवयातच व्हायची. खेड येथील कहाणे परिवारातील यमुनाबाईंसोबत त्यांचं लग्न झालं. पुढे चालून त्यांना बाळोजी व भागू ही मुलं झालीत.
माणसांतच दिसला देव
संताजी महाराजांच्या बालपणीची एक आख्यायिका सांगितली जाते. ते रोज आपल्या आईसोबत गावातील चक्रेश्वर मंदिरात जात. गावातील या मंदिरात आई पूजा करायची आणि देवाला नैवेद्य अर्पण करायची. चक्रेश्वराच्या मंदिरात अनेकजण आश्रयाला राहत.
एके दिवशी एक भुकेने व्याकूळ झालेला मनुष्य त्यांना दिसला. संताजींनी नैवेद्याचं ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. तो तृप्त झाला. मात्र नैवेद्यासाठी आणलेलं ताट संताजींनी कुणालातरी दिल्याने आई रागावली. त्यावर संताजी महाराज म्हणाले मी, ज्याला अन्नाची जास्त गरज आहे त्याला पहिल्यांदा ते दिलं पाहिजे. लहानपणीच त्यांना माणसातील ईश्वर दिसला.
संत तुकाराम महाराज आणि संताजी
संताजी महाराज आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत. संत तुकाराम महाराजांचा प्रभाव जनमानसावर वाढत होता. संताजी महाराजदेखील त्यामुळे प्रभावित झालेत. संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात ते टाळकरी म्हणून साथ करू लागले. संत तुकाराम महाराजांच्या प्रबोधनाच्या अमृतरसाचा त्यांना निरंतर आस्वाद घेता येऊ लागला.
संत तुकाराम महाराज शिक्षित होते. त्यांचं वाचन आणि लेखन दांडगं होतं. कधी कधी उत्स्फूर्तपणे कीर्तनातून एखादा अभंग तुकोबारायांना सुचायचा. यावेळी संताजी महाराज तो अभंग लिहून घ्यायचे. संताजी महाराजांची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. त्यांना बरंच काही जसंच्या तसं लक्षात राहायचं.
‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’’ला सुरुवात
प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संत तुकाराम महाराजांच्या तालमीत संताजी महाराज घडत होते. त्यांच्या विचारांना एक दिशा मिळाली होती. दैनंदिन व्यवहार, शेती, व्यवसाय, प्रपंच, समाज अशा अनेक विषयांवरील अभंगातून संत तुकाराम महाराजांचं कीर्तन व्हायचं.
संताजी महाराजांच्या ‘‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’’ला संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यात आल्याने सुरुवात झाली. संताजी महाराजांच्या लेखनातही हा प्रभाव जाणवायला लागला. त्यांच्या स्वतंत्र लेखनाला कधीचीच सुरुवात झाली होती.
संत तुकाराम महाराज यांनी वारकरीधर्मातील स्वातंत्र्य, समता, बंधुत्त्व, मानवता या मूल्यांची पेरणी जनमानसात केली. मानवी कर्तव्यं त्यांनी सांगितलीत. कर्मकांड, यज्ञयाग, विविध क्लिष्ट उपासना, भटा-ब्राह्मणांच्या मध्यस्थीशिवाय सर्वांनाच देवाचं प्रेम मिळवता येतं हे त्यांनी सांगितलं. अनिष्ट रूढी, पंरपरांवर संत तुकाराम महाराजांनी घणाघाती प्रहार केलेत.
आध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितलं. त्यामुळे वैदिक कर्मकांड करणाऱ्या ब्राह्मणवर्गाचा विरोध व छळ त्यांना भोगावा लागला. संताजी महाराज हे त्यांच्या पक्षातले म्हणून हा दाह त्यांच्याही वाट्याला आलाच. मात्र ज्यांनी जगद्गुरू तुकोबारायांचा आदर्श डोळ्याांसमोर ठेवला त्यांना कसली भीती? संताजी महाराज याही विपरित परिस्थितीत डगमगले नाहीत.
त्यांनी आपल्या लेखनाचं व प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. संत तुकाराम महाराजांनी दाखविलेला मानवतेचा महामार्ग त्यांनी कधीच सोडला नाही. अभंगांसह त्यांनी ‘‘शंकर दीपिका’’, ‘‘योगाची वाट’’, ‘‘निर्गुणाचं लावण्य’’ आणि ‘‘तेल सिंधू’’ या ग्रंथांचही लेखन केल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळतो.
इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा संताजींनी वर आणल्या
ब्राह्मणी वर्चस्वाचा फटका तुकोबारायांना बसलाच. शिक्षेचा भाग म्हणून जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथा इंद्रायणीत बुडवल्या. सर्वसामान्य माणसांतील आणि ईश्वर यांतील मध्यस्थी करणारा तुकोबारायांनी हटवला हाच ब्राह्मणांच्या लेखी त्यांचा अपराध होता.
जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगांची गाथा हा मानवमुक्तीचा महाग्रंथ होता. सर्वसामान्य माणसाची लाईफगाईड होती. संत तुकाराम महाराज गाथा बुडवल्यावर अस्वस्थ झालेत. त्यांनी अन्नपाणी सोडलं. संताजी महाराजांना त्यांची ही अस्वस्थता पाहवली नाही. त्यांनी इंद्रायणीत बुडवलेली गाथा जनसागरातून बाहेर काढण्याचं मोठं काम सुरू केलं.
त्यांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होती. त्यांच्या स्मरणातले तुकोबारायांचे अभंत त्यांनी कागदावर उतरवेलत. तुकोबारायांचे श्रोते, त्यांचे चाहते यांना भेटून त्यांचे अभंग त्यांनी पुन्हा मिळविले. संताजी महाराजांच्या या कार्याचे उपकार अखिल विश्व कधीच विसरू शकणार नाही. सालो-मालोसारखे चोरकवीदेखील त्या काळात होतेच. प्रवासाची विशेष सुविधा त्या काळात नव्हती.
रेकॉर्डडिंगवगैरे कोणतंच तंत्रज्ञान नव्हतं. तरीही त्यांनी संकलक, संशोधक आणि संपादकत्त्वाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. त्यांनी हे कसं केलं असेल, आपण कल्पना केलेलीच बरी. त्यांना किती जिवाचा आटापीटा करावा लागला असेल? किती खटाटोप, कित प्रवास करावा लागला असेल? पण त्यांनी हे कार्य निष्ठेनं केलं. त्यांनी हे कार्य त्यावेळी केलं नसतं तर आज जगद्गुरू तुकोबाराय आहे त्यापेक्षा काहीतरी वेगळ्याच स्वरूपात आपल्यासमोर मांडले गेले असते.
जगण्याचं सोपं तत्त्वज्ञान देणारी अभंगरचना
जगद्गुरू तुकोबारायांचा आदर्श त्यांनी आपल्या डोळ्याांसमोर ठेवला. त्यांची वाणी, त्यांची कृती आणि त्यांचं लेखन हे वैश्विक मानवकल्याणार्थच झालं. गैरमार्गाचा अवलंब करून स्पर्धा करू नये, माणसामाणसांत भेदभाव करू नये, अहंकार, मत्सर, ऐहिक संपत्तीचा वृथा अभिमान बाळगू नये, मानवी कल्याणासाठी आणि उत्कर्षासाठी आपली प्रत्येक कृती असावी.
मानवाच्या कल्याणाला परम मानावे, योग्य मार्गाने पैसा कमवावा आणि तसाच त्याचा विनियोग करावा, कोणाचाही तिरस्कार करू नये, सर्वांप्रती दयाभाव असावा असे साधासोपे संदेश त्यांनी आपल्या अभंगतांतून, प्रबोधनांतून दिलेत. हे सर्व त्यांच्या मनात, विचारांत आणि कृतीत भिनलं होतं. त्यांच्या लेखनानेही मानवतेचं क्षितिज व्यापलं.
त्याची काव्यप्रतिभा विलक्षणच होती. त्यांच्या तेलाच्या व्यवसायातील अनेक रूपकं, उपमा, अलंकार व चित्रण त्यांच्या अभंगांतून झळकतं.त्यांच्या सहजलेखनात किती मोठ्ठं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं, हे पुढील काही अभंगांवरून लक्षात येईलच. ……
मजशी ते ब्रम्ह्ज्ञान काही नाही । आपुल्या कृपेने होईल सर्वथाही ।। 1 ।।
होईल मज आणि माझिया कुळांशी । पांडुरंग मुळाशी सर्व आहे ।। 2।।
संतु म्हणे ब्रह्म ब्रह्म सर्व जाणे । आपुले ते मन सुधारले ।। 3 ।।
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग । देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ।।1।।
त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाही । प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी ।।2।।
संतु म्हणे असा अंभग गाइला । पुढे चालु केला देहावरी ।।3।।
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा । नंदी जोडियला मन पवनाचा ।।1।।
भक्ति हो भावाची लाट टाकियली । शांती शिळा ठेवीली विवेकावरी ।।2।।
सुबुध्दीची वढ लावोनी विवेकांस । प्रपंच जोखड खांदी घेतीयले ।।3।।
फेरे फिरो दिले जन्मवरी । तेल काढियले चैतन्य ते ।।4।।
संतु म्हणे मी हे तेल काढियले । म्हणुनी नांव दिल संतु तेली ।।5।।
मन मोहाची करुनि खुटी । लाठीस ठोकली बळकटी ।।1।।
फिरे गरगरा लाठी भोवताली । ध्यान जाईना लाठीवरी ।।2।।
संतु म्हणे माझ्या घाण्याची ती खुटी । पहा उठाउठी अगोदर ।।3।।
क्षमा शांती जया नराचिये देहीं। दुष्ट तया कांही करीत नाही ।।
जरि ही कोणाशीं राग फार आला । तरि तुं धरिरे शांती फार ।।
संतु म्हणे शांती ज्यांनी सोडियली । तेथेँ उडी आली यमाजिची ।।
आम्ही तो ऐकतो संतुचा उपदेश।
आमुचा उद्देश घराकडे।। हालवितो माना ऐकुनियां खुणा।
विसरलों जाणा घरीं जाता।। संतु म्हणे तुम्हा सांगतों मी वेळीं।
आयत्या वेळीं कांही होणें नाहीं ।।
तुकोबांनी केली पूर्तता संताजींची….
मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी इ.स. 1688 साली संताजी महाराजांनी देह ठेवला. इथे एक आख्यायिका सांगितली जाते. संताजी महाराजांचं निर्वाण झालं. त्यांच्या समाधीची सज्जता झाली. चंदनाच्या पाटावर त्यांचा देह ठेवण्यात आला. त्यानंतर त्यांना मूठमाती देणे सुरू झाले.
यावेळी एक चमत्कार झाला असे सांगतात. अनेकजणांनी मूठमाती देऊनही त्यांचा चेहरा बुजत नव्हता. शेवटी संत तुकोबाराय यांनी मूठमाती दिल्यावर ही पूर्तता झाली असे म्हणतात. यातील काव्यात्मक वर्णन किंवा चमत्कार जरी बाजूला ठेवला तरी संत तुकोबारायांच्या आणि संताजी महाराजांच्या कार्याची व दिशेची एकरूपता यातून स्पष्ट होते.
जगद्गुरू तुकोबाराय आणि संताजी जगनाडे महाराज हे दोन बिंदू आहेत. या दोन बिंदूंना जोडणारी एक सरळ रेघ आहे. ती रेघ वाकडीतिकडी नाही, अस्पष्ट नाही. ती ठळक आणि स्पष्ट आहे. ही रेघ आहे त्यांच्या प्रेमाची, विश्वासाची, श्रद्धेची आणि आपुलकीची. एका ज्ञानसाधकाच्या, प्रबोधनकाराच्या, तत्त्ववेत्त्याच्या ऐहिक आयुष्याला जरी मर्यादा असली तरी, त्यांच कार्य अमर्याद, असीम, अभंग आणि अखंडच असतं. वारकरीधर्मातील संत जगनाडे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन……
जय हरी !
सुनील इंदुवामन ठाकरे
[email protected]
हेदेखील वाचा
हेदेखील वाचा
[…] संताजी महाराजांनी केला ‘हा’ मोठा च… […]