‘भारत बंद’ला मारेगावात उत्स्फुर्त प्रतिसाद

अत्यावश्यक सेवा वगळता 100 टक्के शहर बंद

0

नागेश रायपुरे, मारेगाव: देशातील विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला मारेगाव शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. लोकांनी स्वयंस्फुर्तीने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. बंदसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी समर्थनाच्या मोर्चात भाजप वगळता सर्वच पक्ष सहभागी होत बंदमध्ये सहभागी झालेत.

केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन शेतकरी कायद्याविरोधात सध्या दिल्ली बॉर्डरवर शेतक-यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलकांतर्फे आज भारत बंदची हाक देण्यात आली होती. मारेगावात देखील स्वयंस्फुर्तीने बंद पाळण्यात आला. सकाळी 10 वाजताच्या दरम्यान सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्थानिक मार्डी चौकात एकत्र आले. तिथे राजमाता जिजाऊ, बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, शहीद भगत सिंग यांच्या तेलचित्राला अभिवादन करून तिथून आंदोलक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तिथून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा घोंसा रोड, बस स्टॅन्ड चौक, मार्डी रोड, मेन रोड असा मार्गक्रमण करत निघाला. मोर्चात व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवावे असे आवाहन करण्यात येत होते. दरम्यान मेडिकल यासारख्या अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मारेगाव बंद होते.

या बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वराज्य शेतकरी युवा संघटना, व्यापारी संघटना यांच्यासह सामाजिक संघटनेने बंदला पाठिंबा दिला व ते बंदसंबंधी काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झाले.

हे पण वाचा…

नवीन वागदरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

हे पण वाचा…

तेलंगणात कत्तलीसाठी जनावर घेऊन जाणाऱ्या तीन बोलेरो जप्त

Leave A Reply

Your email address will not be published.