जितेंद्र कोठारी, वणी: ‘वणी बहुगुणी’च्या वृत्तमालिकेमुळे सेक्स रॅकेट चालकांचे धाबे दणाणले असून आता राजरोसपणे चालणारे हे रॅकेट गुपचूप चालवण्यातच त्यांनी धन्यता मानली आहे. काहींनी तर परिसरातील ग्राहकांना वणी ऐवजी वरोरा येथील एका हॉटेलमध्ये सर्विस देणे सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान शहर आणि परिसरात चालणा-या सेक्स रॅकेटबाबत पोलीस कोणतीही भूमिका घेत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर होत आहे. त्यामुळे आता याविरोधात नागरिकांनीच बाह्या सरसावल्या आहे.
शुक्रवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी साईनगरी येथील नागरिकांनी सेक्स रॅकेट चालण्याच्या संशयातून एका घरावर धाड टाकली. यात एक तरुण व तरुणी आढळून आली तर एक तरुणी मागच्या दाराने पळून गेली. नागरिकांनी तरुणाला चोप दिला असता त्याने गैरकृत्याबाबत कबुली दिल्याची माहिती आहे. दरम्यान तिथे पोलिसांचीही एन्ट्री झाली. मात्र ताब्यात घेऊन तपास करण्याऐवजी केवळ तंबी देऊन त्यांना सोडून दिल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
परिसरात काही दिवसांआधी शहरातील दोन डॉक्टरची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या संभाषणात दलाल तसेच अड्यांची माहिती होती. यावरून शहरात सेक्स रॅकेटची व्याप्ती समोर आली. मात्र या प्रकरणातही या दोघांना साधे चौकशीसाठीही ताब्यात घेण्यात आले नाही. त्यानंतर साईनगरी परिसरातही नागरिकांनी ताब्यात घेतलेल्यांना केवळ तंबी देऊन सोडण्यात आले. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे. त्यातच सर्वसामान्य नागरिक धाड मारू शकतात मग पोलीस प्रशासन का नाही? असा सवाल ही आता शहरात विचारला जाऊ लागला आहे.
आंबट शौकिनांची चलो वरोराची हाक…
सेक्स रॅकेटबाबत शहरात चर्चा होत असल्याने दलाल व सेक्स रॅकेट चालकांचे धाबे दणाणले आहे. व्हॉट्सऍप स्टेटसवरून मुलींची माहिती देण्याचे प्रकार बंद झाले असून आता ग्राहकांना थेट फोनद्वारा कॉन्टॅक्ट केला जात असल्याची माहिती आहे. याशिवाय काहींनी तर शहरात आलेले अपयश बघून, वरोरा येथील आनंदवन चौकातील एका हॉटेलमध्ये सेटिंग करून यात काही प्रमाणात ‘यश’ मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या हॉटेलमध्ये वणी येथील परिसरातील ग्राहकांना सर्विस दिली जात आहे. दरम्यान गावाबाहेर सेवा मिळत असल्याने आंबट शौकिनही खूश आहेत. या हॉटेलला 1 हजार रुपये सर्विस चार्ज दिला जात असल्याची सू्त्रांची माहिती आहे.
नागपूरच्या संस्थेचीही या प्रकरणावर नजर
सेक्स रॅकेटविषयी नागपूर येथील फ्रिडम फाईट ही संस्था कार्यरत आहे. ही संस्था या व्यवसायातील 17 वर्षांखालील मुलींची यातून सोडवणूक करते आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत करते. गेल्या दोन तीन वर्षांत या संस्थेच्या पुढाकाराने वणी येथे आठ ते दहा ठिकाणी धाड टाकण्यात आली होती. त्यातील 3-4 धाड यशस्वी ठरली व त्या धाडीत ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींची सुटका करून त्यांचे पूनर्वसन करण्यात करण्यात आले. या संस्थेनेही स्थानिक पोलिसांच्या ऐवजी जिल्हा पोलिसांची मदत घेऊन ही कामगिरी केली हे विशेष.
सेक्स रॅकेटबाबत वृत्तमालिका सुरूच राहणार…
सेक्स रॅकेट बाबत वणी बहुगुणीने क्रमानुसार 6 भाग प्रकाशित केले आहे. तब्बल 40 हजार पेक्षा अधिक व्ह्यूज या सिरिजला आहे. फोन व व्हाट्सएप मॅसेज द्वारे शेकडो वाचकांनी आपले अभिप्राय ‘वणी बहुगुणी’जवळ प्रकट केले. काही वाचकांनी संवेदनशील मुद्यावर बातमीसाठी धन्यवाद व आभार प्रकट केले, तर काही वाचकांनी अशा बातम्यांमुळे शहराची प्रतिष्ठा मलिन होत असल्याचेही मत नोंदविले. दरम्यान ज्या परिसरात अशा घटना घडत आहे. त्या परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलीस प्रशासनाला देणे गरजेचे आहे किंवा साईनगरीसारखी कारवाई करून शहरातील वातावरण दुषीत करणा-यांविरोधात तक्रार करणे गरजेचे आहे.
वणी शहराच्या सामाजिक व सांस्कृतिक वारसाला धक्का पोहचविणाऱ्या अशा गैरकृत्यांबाबत नागरिकांना सावध करणे व शहराची वैभवशाली संस्कृती टिकून राहावी हा या मागचा उद्देश होता. यापुढेही वणी शहराची सामाजिक व सांस्कृतिक ठेवा धोक्यात येत असेल तर त्यांचे पितळ उघडे पाडण्याचे कार्य ‘वणी बहुगुणी’ कोणाच्याही दबावाखाली न येता करणार आहे. जो पर्यंत या प्रकरणी कार्यवाही होत नाही, रॅकेट चालक, दलाल यांच्या मुसक्या आवळल्या जात नाही, तोपर्यंत ‘वणी बहुगुणी’ची ही वृत्तमालिका सुरूच राहणार.
हे देखील वाचा: