जितेंद्र कोठारी, वणी: कृषी केंद्राच्या गोदाममध्येच कर्मचा-याने आत्महत्या केल्याची घटना कायर येथे उघडकीस आली आहे. शुक्रवारी दिनांक 17 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. ऋषिकेश गजानन क्षीरसागर (20) रा. दरा ता. झरी असे आत्महत्या करणा-या कर्मचा-याचे नाव आहे.
मृतक ऋषिकेश हा कायर येथील बाजार रोडवरील एका कृषी केंद्रात गेल्या 6-7 महिन्यांपासून काम करायचा. सध्या कृषी केंद्राच्या मालकाची तब्येत ठिक नसल्याने ऋषिकेश हाच कृषी केंद्र सांभाळायचा. दिवसभराच्या विक्रीतून आलेली रक्कम तो संध्याकाळी मालकाच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करायचा व मित्रांसह तो कायरवरून गावी दरा येथे परत जायचा.
संध्याकाळी कृषी केंद्र बंद करण्याच्या वेळी दुकानात ऋषिकेश आढळून आला नाही. कृषी केंद्राच्या शेजारीच कृषी केंद्राचे गोदाम आहे. ऋषिकेश तिथे गेला असावा म्हणून तिथे जाऊन शोधले असता त्या ठिकाणी ऋषिकेशने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला.
उत्तरिय तपासणी झाल्यावर आज दरा येथे ऋषिकेशवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृतकाचे काका मधूकर क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे. ऋषिकेशने उचललेल्या या पावलामुळे गावात शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.