कंत्राटींच्या खांदयावर कोविड केअर सेंटरचे ओझे

नाव उपचार केंद्र, पण मिळते फक्त शिक्का..

0

जब्बार चीनी, वणी: सध्या कोविड-19 या विषाणूमुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात अडकून असलेल्या ईतर जिल्हयातील किंवा राज्यातील नागरिकांना स्वगृही पाठविण्याकरीता वैद्यकीय तपासणीची गरज आहे. याशिवाय ईतर जिल्हयात किंवा राज्यात अडकून पडलेले नागरीक जिल्हयात अथवा तालुक्यात दाखल झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागले. यासाठी आरोग्य प्रशासनाकडून परसोडा येथील शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर उभारले आहे. परंतु या सेंटरचा संपूर्ण डोलारा कंत्राटी कर्मचा-यावर उभा असून हे सेन्टर केवळ होम कॉरेन्टाईचा शिक्का मारण्यापुरते मर्यादीत झाले आहे. याशिवाय इथे तपासणी करणा-या डॉक्टरांना सुरक्षेच्या सुविधा अपु-या असल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे.

केवळ सौम्य लक्षणे असलेले किंवा संशयित रुग्णांना ठेवून त्यांची काळजी घेण्यासाठी कोविड केअर सेंटर्सची निर्मितीचे आदेश शासनाकडून आले होते. तात्पुरत्या स्वरूपाची सुविधा असल्याने वसतिगृहे/ शाळा/ हॉटेल्स इत्यादींना विलगीकरण कक्ष किंवा कोविड केअर सेंटर्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकते असे निर्देश प्रशासनाने दिले होते. त्यानुसार शहरापासुन 5 किलोमीटर दुर असलेल्या परसोडा येथील शासकीय वसतिगृहाला ताब्यात घेऊन येथे दोनशे बेडचे कोविड उपचार केंद्र उभारण्यात आले आहे. सदर केंद्र 7 मे पासुन सुरू झाले असुन या केंद्रातर्फे 232 नागरीकांना मंगळवार पर्यंत होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. मात्र या केअर सेंटरचीच योग्य ती ‘केअर’ घेतली जात नसल्याचे समोर येत आहे.

समस्येचा पाढा सुरूच…
वणी-यवतमाळ रोडवर पळसोनी फाटयाजवठ असलेल्या या केंद्रासंबंधी एक साधा फलकसुद्धा लावलेला नाही. पळसोनी फाटयावर मोठा फलक लावुन तिथे चेकपोस्ट बनवुन बाहेरून येणा-या सर्व नागरीकांची तपासणी इथे व्हायला हवी होती. परंतु असे नसल्याने नागरीकांना वणीला येउन परत या केंद्रावर यावे लागत आहे.

ईतर जिल्हयात किंवा राज्यात अडकून पडलेले नागरीक वणी तालुक्यात दाखल झाल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी आरोग्य प्रशासनाकडून कोणत्याच सोयी उपलब्ध नाहीत. कर्मचा-यांना इथे पीपीई कीट, ग्लव्ह्स व मास्कचा देखील अपुरा पुरवठा आहे. केवळ पाच हजारात मिळणारी एकही थर्मल स्कॅनर मशीन सुद्धा या केंद्रावर नाही. शिवाय अपु-या सोयी सुविधांमुळे इथे आलेल्या रुग्णांची तपासणी ही झाडाखाली करण्यात येत आहे. सुरूवातीचे दोन दिवस तर येथे पीण्याच्या पाण्याची सोय सुद्धा नव्हती. महत्त्वाचं  म्हणजे या महत्त्वाच्या सेंटरमध्ये नेमलेले डॉक्टर व परिचारीका यांच्यातील अधिकाधिक कर्मचारी हे कंत्राटी आहेत. 

रुग्णांची झाडाखालीच तपासणी….

या केंद्रावर येणा-या बहुतांश नागरीकांना फक्त विचारपूस करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जात आहे. जर तपासणी न करता फक्त शिक्काच मारायचा आहे तर उन्हातान्हात एवढ्या दुर कशाला बोलाविता असा सवाल आता इथे आलेल्या व्यक्ती विचारत आहेत.

आरोग्य विभागाकडे किंवा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे साधी मशिन, ग्लव्ज, पीपीई किट यासारख्या वस्तू घेण्याकरिता 15-20 हजार रूपये नसतील का? आमदारसंजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जाहीर केलेले आरोग्य सेवेसाठी 50 लाख कुठे गेले? महसुल विभागाचे दोन महत्वपुर्ण अधिकारी स्वत‍ डॉक्टर असुन वणीच्या आरोग्य विभागाची ही दयनिय स्थिती असणे हे वणीकरांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

आमदारांचा ‘दवा’ ऐवजी ‘दारू’वरच जोर…
सध्या आमदारांनी दारू विक्री विरोधात दंड थोपटले आहे. वणीतील एक वाईनशॉप खासदारांचे असल्याने त्यांना शह देण्यासाठी आमदारांनी दारूचा विषय प्रतिष्ठेचा केल्याचे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे आरोग्याच्या सेवेबाबत मात्र आरोग्य रक्षकांना अपु-या सेवा सुविधांबाबत काम करावे लागत आहे याकडे मात्र आमदारांचे दुर्लक्ष आहे. आमदारांनी ‘दारू’साठी जसा पुढाकार व तत्परता दाखवली तसाच पुढाकार व तत्परता ‘दवा’बाबत घेतल्यास जनतेच एक चांगले चित्र निर्माण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.