पिकअपची बैलगाडीला जबर धडक, शेतकरी जखमी तर बैल गंभीर

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वणी-वरोरा रोडवर एका पिकअप वाहनाने जबर धडक दिली. सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या धडकेत शेतकरी व बैल जखमी झाले आहेत. तर पिकअप वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाल्मिक लोहकरे (58) रा. वणी हे आपल्या शेतात बैलगाडीने विरुद्ध दिशेने जात होते. याचवेळी संविधान चौकातून समोरून येणाऱ्या पिकअप वाहन (MH28 BB5320) ने बैलगाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत वाल्मिक यांना गंभीर इजा झाली. त्यांना वणीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये बैलाचे शिंग तुटून वेगळे झाले व बैलाची प्रकृती गंभीर आहे. अपघातात गाडी चालक किरकोळ जखमी आहे. अपघाताची खबर मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.