मारेगाव तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ, मार्डी येथील शेतातील इंजिनची चोरी

खांब चोरट्यांना कोलगाव येथील तरुणाने पकडले

भास्कर राऊत, मारेगाव: शेतासाठी वापरण्यात येणारे डिझेल इंजिन चोरट्याने चोरून नेले. ही घटना मार्डी जवळील तुकापूर शिवारात शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने तालुक्यातील ओलिताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांममध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. मारेगाव तालुक्यात चोरीच्या घटना मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. नुकतेच कोलगाव येथे भंगाराची चोरी करीत असताना एकाला रंगेहात पकडल्याची घटना घडत नाही, तोच आज मार्डिजवळ असलेल्या शेतातील इंजिन चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

मार्डी -खैरी रस्त्यावर मार्डी जवळील तुकापूर शिवारात मार्डी येथील कलावती तात्याजी कालर यांचे शेत आहे. त्या शेतामध्ये ओलीतासाठी मागीलवर्षी नवीन घेतलेले इंजिन ठेवलेले होते. परंतु शुक्रवारी दि. 19 ऑगस्टच्या रात्रीच्या वेळेस एका चारचाकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनामध्ये इंजिन चोरून नेण्यात आले. तशा प्रकारच्या स्पष्ट खुणासुद्धा शेतामध्ये असल्याचे आढळून आले. यावरून शेतमालकाने मारेगाव पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

कोलगाव येथे भंगार चोरट्याला पकडले रंगेहाथ
नवरगांव धरणाच्या कॅनलजवळ असलेल्या नाल्याच्या पुलावर लोखंडी खांब गाडलेले होते. हे गाडलेले खांब चोरताना एकाला कोलगाव येथील साहसी युवकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. कोलगाव शिवारात मागील काही दिवसांपासून काही अनोळखी व्यक्ती रात्रीच्या वेळेस फिरत आहेत याचा सुगावा तेथील काही युवकांना लागलेला होता. त्यामुळे काही युवक या चोरट्यांच्या मागवर होते.

दि. 16 ऑगस्टला रात्रीच्या वेळेस येथील युवक अशीच गस्त घालत असताना चार ते पाच जणांचे टोळके कोलगाव शिवारातील नवरगाव कॅनल जवळ असलेल्या नाल्यावरील पुलावर असलेले लोखंडी खांब आरीपत्याने कापत असल्याचे आढळून आले. हे दिसताच एकाने गावातील काही युवकांना मोबाईलवरून कॉल करून बोलावले. कोलगाव येथील तरुणांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील त्यातील दोघे सापडले. दरम्यान संधी साधून एक चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चंदन संदन चौधरी वय 44 वर्षे रा. चिकणी, ता. सेमरी, जी. बगसर, बिहार याला अटक केली आहे. त्याच्याजवळून दोन लोखंडी आरी, किंमत 100 रुपये, 6 नग आरीपत्ते, किंमत 60 रुपये, एक हिरो डिलक्स दुचाकी MH 29 AE 2201 असा एकूण 25 हजार 160 रुपयाचा माल जप्त केला. यांच्यावर कलम 379, 511 नुसार गुन्हा दाखल केला असून इतर आरोपिंचा तपास मारेगाव पोलीस करीत आहेत. युवकांनी दाखवलेल्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हे देखील वाचा:

चक्क पत्रकार पतीनेच दिली शिक्षक पत्नीला जीवे मारण्याची सुपारी

लाल सिंग चढ्ढा, रक्षाबंधन सिनेमाला झोपवणारा ‘कार्तिकेय 2’ वणीत रिलिज

पुरात खराब झालेली सोलर सिस्टम मोफत दुरुस्त करा

Comments are closed.