वणीत चोरीचे सत्र थांबता थांबेना… आता दुचाकी व वायर चोरीची घटना समोर

दीपक चौपाटीवरून दुचाकी तर समर्थ नगरमधून 50 हजारांच्या वायरची चोरी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरातून 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास एक दुचाकी चोरीची घटना घडली. तर स्वामी समर्थ नगर येथे घराचे काम सुरू असताना एका अज्ञात चोरट्याने 50 हजारांचे वायरचे बंडल चोरून नेल्याची घटना घडली. दोन्ही घटनेत तक्रारीवरून वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणीत चोरीचे सत्र काही केल्या थांबता थांबत नाहीये. रोज चोरीच्या घटना उघडकीस येत आहे. दुचाकी चोरी, घरफोडी, दुकानफोडी यामुळे वणीकर दहशतीत आले आहे.

पहिली घटना ही दीपक चौपाटी परिसरात घडली. अल्ताफ रंगरेज यांचे दीपक चौपाटी परिसरात दुकान आहे. 5 फेब्रुवारी रोजी दु. 12 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या काळ्या रंगाची स्प्लेन्डर प्लस या दुचाकीने (MH 29 BY 7486) आपल्या दुकानात गेले होते. ते दुकानाच्या मागे काम करीत होते. काम संपवून दुचाकी घेण्याकरिता आले असता त्यांना दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला विचारपूस करून शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी 20 फेब्रुवारी रोजी याबाबत वणी पोलिसात तक्रार दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

चोरीची दुसऱी घटना स्वामी समर्थ नगर येथील साहिल सलाट यांच्याकडे झाली. त्यांच्या घराचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. टाईल्सचे काम सुरू असल्याने वायर फिटिंगचे काम अर्धवट होते व वायरचे बंडल भिंतीवर लटकवून ठेवलेले होते. या ठिकाणी साहिल यांनी देखरेख ठेवण्याकरिता चौकीदार ठेवलेला होता. साहिल हे वेळोवेळी घराचे काम पाहण्यासाठी जात होते.

2 फेब्रुवारी रोजी त्यांनी पाहणी केली असता सर्व सुरळीत चालू होते. यानंतर 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 ते 4 वाजता दरम्यान पाहणी केली असता नव्याने विकत आणलेले जवळपास 50 ते 60 हजार रुपये किमतीचे वायर अज्ञात चोरट्याने कापून चोरून नेल्याचे दिसून आले. या दोन्ही घटनेत अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा: 

Comments are closed.