यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी टिकाराम कोंगरे

उपाध्यक्षपदी संजय देरकर व वसंतराव घुईखेडकर

0

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी वणी तालुक्यातून निवडून आलेले काँग्रेसचे टिकाराम कोंगरे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी मारेगाव तालुक्यातून निवडून आलेले संजय देरकर यांची निवड झाली आहे. याशिवाय उपाध्यक्षपदी वसंतराव घुईखेडकर यांची ही निवड झाली आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती. यात काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे अध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार असल्याचे आधीच निश्चित होते. मात्र त्यात कुणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यात वणीचे काँग्रेसचे नेते टिकाराम कोंगरे यांनी बाजी मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

अध्यक्षपदासाठी टिकाराम कोंगरे, मनीष पाटील यांच्यासह संजय देशमुख, प्रकाश पाटील आणि वसंतराव देवरसकर यांच्या नावाची चर्चा होती. टिकाराम कोंगरे यांच्या नावाला खासदास बाळू धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांची पसंती होती. तर शिवाजीराव मोघे आणि मनोहरराव नाईक यांची मनीष पाटील यांच्या नावाची शिफारस केली होती. अखेर यात टिकाराम कोंगरे यांनी बाजी मारली.

महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसकडे अध्यक्षपद तर शिवसेना व राष्ट्रवादीकडे उपाध्यक्ष पद देण्याबाबत ठरले होते. त्यानुसार काँग्रेसतर्फे टिकाराम कोंगरे तर शिवसेनेकडून मारेगाव येथून लढलेले संजय देरकर व दिग्रस येथून विजयी झालेले वसंतराव घुईखेडकर यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले. अनेक दिग्गज या निवडणुकीत उभे असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. 

या निवडणुकीत 21 जागांपैकी महाविकासआघाडीला 15, भाजपप्रणित शेतकरी सहकार विकास आघाडीला तीन जागा तर तीन जागांवर अपक्ष विजयी झाले होते. 15 पैकी 9 जागा जिंकत काँग्रेसने अध्यक्षपदासाठी दावेदारी पक्की केली होती. खासदार बाळू धानोरकरांनी टिकाराम कोंगरे यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. तर मोघे आणि मनोहरराव नाईक यांनी मनीष पाटील यांच्यासाठी प्रयत्न केले होते. पाटील हे सर्वाधिक मतधिक्याने निवडून आले होते. मात्र यात अखेर खासदार बाळू धानोरकरांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. 

हे पण वाचा:

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ‘वणी बहुगुणी’ची जाहिरात स्किम जाहीर

हे पण वाचा:

वणीत ओबीसींचा रेकॉर्डब्रेक मोर्चा, सुमारे 8 हजार लोक मोर्चात सहभागी

Leave A Reply

Your email address will not be published.