12 वर्षांपासून मार्की येथील पाण्याच्या टाकीचे काम अपूर्णच
गावक-यांना करावा लागत आहे पाणी टंचाईचा सामना
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (बु) या गावात पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने सन 2007 मध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. सदर कामासाठी 2005 ते 10 या काळात ग्रामीण पाणीपुरवठा योजने अंतर्गत बांधकामाकरीता लाखो रुपयांचा निधी आला. परंतु लाखो रुपये खर्च करूनही पाण्याच्या टाकीचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने प्रचंड संताप व्यक्त केल्या जात आहे.
या कामासाठी गावात पाणीपुरवठा समिती स्थापन केली गेली. सदर काम पाणी पुरवठा समिती मधील काही पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून पूर्ण करायचे होते. गावातील एक व्यक्ती अध्यक्ष तर सचिव म्हणून एक महिला होती. सर्व आलेला निधी हा समितीच्या खात्यात जमा होत होता. त्यातूनच सर्व व्यवहार चालत होते. अजूनही या पाणीपुरवठा समितीकडे गावातील पाणीपुरवठा करायचे काम आहे. तरी सुद्धा महावितरणचे पाच लाख रुपये थकीत असल्याने कधीही लाईट कट केल्या जाते व मोटार सुद्धा बंद होत असते. यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
हाच प्रकार मागील 12 वर्षपासून सुरू आहे. मात्र तरी सुद्धा कोणताही अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. मार्की गावात प्रवेश करताच शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याचे चित्र येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाण्याच्या टाकीकडे बघून दिसत आहे. टाकीच्या बांधकामाच्या अपूर्ण कामाकडे बघून गावातील नागरिकांनी सुद्धा ग्रामपंचायतला पाणीकर भरण्यास विरोध करीत आहे.
१२ वर्षापासून मार्की(बु) येथील पाण्याच्या टाकीचे काम होत नसेल तर याला जवाबदार कोण? प्रशासकीय अधिकारी काय करीत आहे? असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे. मार्किं येथे अनेक सरपंच व सचिव आले आणि गेले. मात्र अजून या बाबत कुणीही तो़डगा काढू शकले नाही. शासकीय कामात हलगर्जीपणा करणा-यांवर शासन नियमानुसार दंडात्मक कारवाही करून लाखो रुपये वसूल करावे अशी मागणी गावातील नागरिकडून होत आहे तसेच गावात त्वरित कायमस्वरूपी पाणीपुरवठा करावे अशी मागणी ग्रामवासीयांकडून होत आहे.
हे देखील वाचा:
सर… शाळा कधीपासून सुरू होतेय? आजपासून विद्यार्थ्यांविनाच शाळेला सुरूवात