का केले जाते गणपती मूर्तीचे विसर्जन….

मूर्तीचे विसर्जन-अमूर्ताचा प्रवास!

0

प्रा. डॉ. स्वानंद पुंड, वणी: दूरचित्रवाणीवर गणेशविसर्जनाचा सोहळा सुरू होता. चिरंजीवांचा त्यांच्या बालबुद्धीनुसार स्वाभाविक असा प्रश्‍न होता- इतके दिवस पूजा केलेल्या बाप्पाला पाण्यात का बुडवायचे? पुढचा प्रश्‍न अधिक सखोल- बाप्पा मरणार नाही का? प्रश्‍न हसू येण्यासारखाच होता. आता त्याला परमेश्‍वरी सत्तेचे अमरत्व वगैरे सांगून उपयोग नव्हता.त्याच्या पातळीवरून सुरू केले.

आमची प्रश्‍नोत्तर मालिका सुरू झाली. बाप्पाची मूर्ती कशाची बनविली? तो म्हणाला मातीची. आपण माती कुठून घेतली? शेतातून. आता पाण्यात टाकल्यावर मूर्तीचे काय होते? ती विरघळली. विरघळल्यावर माती कुठे गेली? पाण्यात. पाण्यासोबत कुठे गेली? सगळीकडे. आता आपला बाप्पा दिसतो का? नाही.

पण, त्याची झालेली माती सगळीकडे दिसते की नाही? हो. या मातीत बाप्पाची माती आहे की नाही? हो. म्हणजे ही मातीच आता बाप्पाची माती आहे की नाही? हो. म्हणजे ही मातीच आता बाप्पा आहे की नाही? हो.

कालपर्यंत बाप्पा एका मातीच्या गोळ्यातच दिसत होता बरोबर? हो बरोबर! आता बाप्पा कसा झाला? त्याच्या बालसुलभ आनंदासह घोषणा होती- ‘बाप्पा मोठ्ठा झाला.’ तो उड्या मारत निघून गेला.

बालशैलीचे जाऊ द्या. पण, विसर्जनाचे विज्ञान हेच आहे. मूर्ती कितीही सुंदर असली, तरी ती माध्यम आहे. माध्यमात अडकणे ही मर्यादाच आहे. मूर्ती ही माध्यम आहे अमूर्ताच्या उपासनेचे. अमूर्ताला थेट गवसणी घालता येत नाही म्हणून ‘आलंबन’ रूपात मूर्ती घडविली.

लहान बाळाला थेट चंद्र दिसत नाही. मग आई म्हणते ‘तो पाहा फांदीच्या मागे!’ फांदी माध्यम आहे लक्ष केंद्रित करण्याचे. तशीच मूर्ती माध्यम आहे मनाला केंद्रित करण्याचे. अनेक स्थानी विखुरलेल्या त्याला मूर्तीच्या ठायी केंद्रित करायचे आणि मग मूर्तीच्या द्वारे अमूर्ताकडे न्यायचे. हेच मूर्तिपूजनाचे रहस्य आहे.

मूर्ती मातीचीच असते. या व्रताला पार्थिव गणेशव्रत म्हणतात. पृथ्वीची, मातीची ती पार्थिव. तिचे जलातच विसर्जन हवे. (प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वा त्यानिमित्ताने होणार्‍या पर्यावरणाच्या र्‍हासाच्या ओरडीशी धर्मशास्त्राचा कवडी संबंध नाही.

धर्मशास्त्र प्लास्टरची मूर्ती सांगतच नाही. सांगूही शकत नाही. कारण, धर्मशास्त्र लिहिले तेव्हा हा पदार्थच नव्हता! मूर्तिकारांच्या सोयीकरिता आलेल्या या विषयाकरिता धर्मशास्त्राला वेठीस धरणे निरर्थक आहे. ३६४ दिवस काहीही न करता एक दिवसच पर्यावरणाचा उमाळा येणे हास्यास्पद आहे आणि त्याकरिता धर्मशास्त्राला गृहीत धरणे तर सर्वस्वी गैर आहे. भारतीय संस्कृतीही निसर्गपूजक संस्कृती आहे. ती पर्यावरणाला जोपासते. नाशाचा तर प्रश्‍नच येत नाही.)

मातीची मूर्ती जलात विसर्जित. कारण, जलतत्त्व हे मृत्तिकातत्त्वापेक्षा अधिक व्यापक आहे. ‘भूमी-आपो-अनलो-अनिलो-नभ|’ ही अथर्वशीर्षात वर्णिलेली चढती विकासयात्रा आहे मूर्तिविसर्जन. ‘भूमी’पासून आरंभ करीत ‘भूमा’ अर्थात असीम, अनंतापर्यंत जाणे आहे विसर्जन. विसर्जन मूर्तीचे आहे, मूर्ततेचे आहे. मूर्ताचा त्याग करीत अमूर्तात परमात्म तत्त्वाचे दर्शन घेणे आहे विसर्जन.

सान्त मूर्तीला विरघळवून अनंताशी नाळ जोडणे आहे विसर्जन. साकाराला द्रवीभूत करीत निराकाराला गवसणी घालण्याची मनीषा आहे विसर्जन. संतश्रेष्ठ नामदेवरायांना स्वत: पंढरीनाथांनीच तीर्थयात्रा करायला लावत, अणुरेणूत मीच आहे, हा जो संदेश दिला, तो आचरणात आणण्याची पद्धती आहे विसर्जन.

सर्जनातून पार्थिवत्त्वापर्यंत आलेल्या निर्मितीला उलट्या दिशेनं फिरवत पुनरपी मूळ आत्मरूपात सुस्थिर होण्याच्या साधकाच्या अन्तर्यात्रेचे प्रतीक आहे विसर्जन. कणाकणात ईश्वरी सत्तेच्या विश्वरूपदर्शनाचा मार्ग आहे विसर्जन. जय गजानन!

स्वानंद पुंड -9822644611

Leave A Reply

Your email address will not be published.