जितेंद्र कोठारी, वणी: गुरुवारी दिनांक 19 ऑक्टोबर रोजी वणी येथील बस स्थानकावर विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अनोळखी महिलेचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर महिलेची ओळख पटली असून तिचे नाव रिता नीलेश आसुटकर (44) रा. हिवरा मजरा ता. मारेगाव असे आहे. मृतका विवाहित असून घरगुती वादामुळे मागील एका वर्षापासून ती पठारपूर ता. झरी येथे वडिलांकडे राहत असल्याची माहिती आहे. मृतक महिलेला एक मुलगा व एक मुलगी असून दोघे वणी येथे शिक्षण घेत आहे. गुरुवारी सकाळी रिता हिने तिच्या आईला घरून निघताना मुलांना भेटायला वणीला जात असल्याचे सांगितले होते.
वणी बस स्थानकावर दुपारी एका अनोळखी महिलेच्या तोंडातून फेस येत असल्याचे आढळून आले. काही लोकांनी याची माहिती तातडीने वाहतूक पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेजवळ मोबाईल किंवा कोणतेही ओळखपत्र नसल्याने मृतक महिला कुठली आहे याबाबत पोलिसांना माहिती मिळत नव्हती.
अनोळखी महिलेचा विष प्राशन करून आत्महत्या केल्याबाबत सोशल मिडीयावरील बातम्या सोशल मीडियातून व्हायरल झाल्या. त्यामुळे मृतकाचे वडील विठ्ठल नांदेकर रा. पठारपूर ता.झरी यांना संशय आला. त्यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठून याबाबत खात्री केली व ते वणी पोलीस स्टेशनला पोहचले. मृतका ही त्यांची विवाहित मुलगी रिता निलेश आसुटकर असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
मृतका रिता हिचे लग्न अंदाजे 20 वर्षांपूर्वी मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथील निलेश आसुटकर सोबत झाले होते. तिला 18 वर्षाचा एक मुलगा आणि 16 वर्षाची मुलगी आहे. पती पत्नीच्या दरम्यान वाद होऊन मागील एका वर्षापासून रिता आपल्या माहेरी आईवडिलांकडे पठारपूर येथे राहायला आली होती. दोघांनी घटस्फोटसाठी न्यायालयात अर्ज केलेले होते. त्याची केस वणी कोर्टात सुरु आहे. दरम्यान रिता हिने गुरुवारी आत्महत्या केल्याने सदर प्रकरणाला नवीन वळण आले आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा:
केशव नागरी पतसंस्थेच्या कर्मचा-याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Comments are closed.