भांडण पाहल्याने तरुणाला गोट्याने व काठीने जबर मारहाण

भास्कर राऊत, मारेगाव: धुलीवंदनाच्या दिवशी काही लोकांचे सुरू असलेले भांडण पाहणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. भांडण पाहल्याच्या रागातून तिघांनी गोट्याने व काठीने तरुणास जबर मारहाण केली. दिनांक 7 मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुलीवंदनाच्या दिवशी कोणतेही भांडण, अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो. या दिवशी अनेक लोकांचे तारतम्य जागेवर नसते. दरम्यान चौकात सुरू असलेले भांडण पाहणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी अविनाश लक्ष्मण पवार (26) हा मारेगाव येथील वार्ड क्रमांक 7 येथील रहिवासी आहे. तो होळी खेळण्यासाठी चौकात आला होता. दु. 1.30 वाजताच्या सुमारास चौकात एक भांडण सुरू असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

दरम्यान भांडण सुरू असताना आरोपी अमर चौघुले हा अविनाश जवळ आला व त्याने भांडण का पाहत आहे? अशी विचारणा करीत अविनाशच्या डोळ्यावर गोट्याने प्रहार केला. त्याच वेळी आरोपी किरण पवार हा काठी घेऊन आला व त्याने अविनाशवर काठीने हल्ला केला. तर आरोपी सुनिल पवार याने बुक्क्यांनी फिर्यादीवर प्रहार केला. मारहाण होत असल्याचे पाहून फिर्याादीचा भाऊ मध्ये पडला असता त्याला देखील आरोपींनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेत अविनाश याच्या डोळ्यावर गोट्याचा प्रहार झाल्याने गंभीर ईजा झाली आहे. त्याने तातडीने मारेगाव पोलीस ठाणे गाठत याबाबत तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरोधात भादंविच्या कलम 323, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल आनंद आलचेवार करीत आहे.

हे देखील वाचा:

चिंचमंडळमध्ये दोन कुटुंबात प्रचंड राडा, 2 महिला व एक पुरुष जखमी

यशोगाथा: ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाची इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात उत्तुंग भरारी

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.