कामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा

जागतिक कामगार दिनानिमित्त डॉ. श्याम जाधव यांचे विशेष आर्टिकल

0

कामगार आणि त्यांचे हक्क: दशा आणि दिशा

– डॉ. श्याम जाधव (नाईक)

1 मे रोजी जगभरात जागतिक कामगार दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रासाठी हा दिवस यासाठी विशेष आहे कारण याच दिवशी महाराष्ट्र दिनही असतो. अण्णाभाऊ साठे यांचं कामगारांच्या गौरवार्थ एक अजरामर वाक्य आहे. ‘ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही, तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे,’. जर कामगार नसता तर इथली व्यवस्था ही सक्षमपणे चालली नसती हे यातून दिसून येते. देशाच्या प्रगतीत कामगार वर्गाचं केवळ योगदान नाहीच तर संपूर्ण व्यवस्था ही कामगारांच्या श्रमावर सुरू आहे. असा हा कामगार जागतिकीकरणाच्या आणि खासगीकरणाच्या अजगराच्या विळख्यात अडकला आहे.

 

आज शेतकरी असो शेतमजूर असो किंवा कामगार, शेतकरी म्हणतोय की मी कोणासाठी पिकवतोय तर कामगार म्हणतोय की मी कुणासाठी घाम गाळतोयं. जेव्हा एखाद्या वर्गाचे शोषण होते किंवा त्या वर्गाला योग्य मोबदला मिळत नाही. तेव्हाच त्याच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात. आर्थिक शोषण, पिळवणूक, द़़डपशाही इत्यादींचा विज्ञानाच्या प्रगतीने नविन यंत्रांच्या शोधाने उत्पादन क्षमता कित्येक वाढली पण कामगारांच्या अस्तित्व धोक्यात आले.

 

या दडपशाही किंवा शोषणाविरोधात तो लढत नाही असे नाही तो नेहमीच लढतो. त्याचे संपूर्ण जीवनच संघर्षमय राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम मजुरांच्या प्रश्नांवर विविध कायदे करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ कामाचे तास हे 12 ते 14 वरून 8 तासांवर आणले. मजुरांना साप्ताहिक रजा, गरोदर महिलांना पगारी रजा. इत्यादी सुधारणा केल्या. तर आजच्या काळात इंटक, आयटक यासारख्या संघटना कामगारांच्या हक्कासाठी नेहमी प्रयत्न करतात. मात्र तरीही कायद्याची योग्यरित्या अंमलबजावणी होत नाही व कामगारांना शोषणाला सामोरं जावं लागतं.

 

आपल्याकडे कुशल आणि अकुशल अशा दोन प्रकारे कामगारांचे वर्गीकरण केले आहे. कुशल कामगार हा ब-यापैकी संघटीत आहे. तर अकुशल कामगार हा अद्यापही संघटीत नाही. अकुशल कामगाराची रोजी आधी 270 रुपये होती त्यात वाढ करून सरकारने 279 रुपये केली. मात्र ही रोजी खूप नाही. याच तुलनेत कुशल कामगारांचे दैनिक वेतन अधिक आहे.

 

2005 च्या एका सर्वेनुसार भारतात एकून कामगारांपैकी 83 टक्के कामगार हे अकुशल आहे. अकुशल असल्याने त्यांना रोजगाराच्या संधीही खूप कमी आहे. त्यांचा सामाजिक, आर्थिक स्तर उंचवायचा असेल तर त्यांना कुशल करणे गरजेचे आहे. हे कार्य खूप कठिण नाही. सरकार सहजरित्या अशा कामगारांना ट्रेनिंग देऊन त्यांना कुशल करू शकते. उदाहरण घ्यायचं झाल्यास एक मिस्त्रीकाम करणारा कामगाराला जर ट्रेनिंग देऊन कुशल करण्यात आले तर तो योग्यरित्या घर बांधू शकतो. ज्यात ना लिकेजची समस्या येईल किंवा इतर कोणती समस्या.

 

आपल्या परिसरात परिसरात विटभट्टी कामगार व साखर कारखाना कामगार अशा कामगारांची मोठ्या प्रमाणात आहे तर पूर्व यवतमाळ जिल्ह्यात कोळसा खाण, डोलोमाईट खाण, चुना अशा फॅक्टरी आहेत. हे कारखाने जरी वेगवेगळे असले तरी या सर्व कामगारांचे प्रश्न जवळपास सारखेच आहे. त्यांच्याकडून अत्यल्प मजुरीवर काम करून घेतले जाते. ८ तासांच्यावर काम केल्यास ओटी म्हणून अधिकचा मोबदला दिला जातो. मात्र इथे १२ तासांच्या दोन शिप्ट चालते व त्यात कामगारांकडून १२ तास काम करून घेताहेत.

 

नियमाने प्रत्येक कामगारांचा अपघात विमा काढणे आवश्यक असताना बहुतांश कामगारांचा विमा काढलेला नाही. कारखान्यात अवजड, धुळीने माखलेल्या वस्तूंशी सततचा संपर्क येतो. त्याकरिता कंपनीकडून कामगारांना हेल्मेट, चष्मा, जोडे, हॅन्डक्लोज, व इतर संरक्षण किट देणे गरजेचे असताना कामगारांना सौरक्षण किटही दिली जात नसल्याचे कामगार सांगतात.

 

कारखाने म्हटले की छोटे मोठे अपघात आलेच, मात्र असे छोटे मोठे अपघात झाले तर मजुरांना योग्य ती मदत आणि मोबदला देण्याऐवजी ते प्रकरण दाबण्याच्या प्रयत्न केला जातो. यामागचे कारण म्हणजे कामगारांचा विमा उतरवलेला नसतो शिवाय मजुरांच्या संरक्षणासाठी जे निकष असतात त्याची पूर्तता केली जात नसल्याने या गोष्टी केल्या जाते. शिवाय कारखान्याच्या बाहेर ऍम्ब्युलंस असणे गरजेचे असताना ऍम्ब्युलंस देखील इथे नसते.

 

आज मोठ्या प्रमाणात महिला कामगारही दिसून येते. त्या केवळ पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत नाही तर संपूर्ण घर, संसार, कुटुंब सांभाळून या महिला काम करतात. कापूस निघाला की अनेक गरीब, निम्न मध्यमवर्गीय घरच्या महिला कापूस वेचण्यासाठी घराबाहेर निघतानाचे चित्र नेहमीच दिसून येते. तर अऩेक ठिकाणी जिेथे महिला आणि पुरूष सोबत काम करतात तिथेही तिला भेदभावाला सामोरं जाव लागतं. मजुरांना आधीच मजुरी कमी असताना त्यातही महिलांना त्यापेक्षाही कमी मजुरीवर काम करावं लागतं.

 

कामगार दिन हा श्रमिकांवरील अन्याय व अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष व एकजुटीची प्रेरणा देणारा दिवस आहे. कामगार जरी वेगवेगळ्या कारखान्यात काम करीत असला किंवा त्याचे कामाचे क्षेत्र जरी वेगवेगळे असले तरी त्याच्या समस्या आणि संघर्ष मात्र सारखाच दिसून येतो. त्यामुळे कामगार कोणत्याही क्षेत्रातील असो त्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे. नागपूरमध्ये घरकाम करणा-या मोलकरणींनी संघटीत होऊन संघटीत होण्याचे काय फायदे असतात हे दाखवून दिले. नागपूरमधली मोलकरणीची संघटना ही भारतातील पहिली मोलकरणीची संघटना ठरली आहे.

 

केवळ कामगारांनीच नाही तर व्यवस्थापकांनीही मन मोठे करणे गरजेचे आहे. कामगार हा देखील त्यांच्यासारखाच एक माणूस आहे हे विसरता कामा नये. त्याचा जीव हा तितकाच महत्त्वाचा आहे जितका कारखानदार आणि तिथल्या अधिका-यांचा आहे. शासनाची देखील जबाबदारी आहे की त्यांनी कामगारांसाठी कायदे तर केले आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होते की नाही याचा सारखा पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 1 मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सोबतच साजरा केला जातो. महाराष्ट्र हा देखील कामगारांची मोठी संख्या असलेले राज्य आहे. ज्यावेळी कामगारांचे हक्क आणि अधिकार त्यांना योग्य रित्या मिळेल तोच खरा महाराष्ट्र दिन म्हणता येईल. सर्व संघटीत असंघटित कामगारांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.